लग्नसराईच्या खरेदीसाठी बाजारपेठेला बहर
खरेदीला वेग, उलाढाल वाढली, यात्रा-जत्रांची लगबग
बेळगाव : यात्रा-जत्रा आणि लग्नसराईच्या हंगामाला वेग आल्याने बाजारपेठेला बहर आला आहे. कपडे, सोने-चांदी व इतर किराणा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे बाजारात उलाढाल वाढू लागली आहे. विशेषत: सराफी दुकानांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढत आहे. एप्रिल व मे महिन्यात विविध गावांमध्ये यात्रा-जत्रांचे आयोजन केले जाते. त्याबरोबरच एप्रिल-मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त साधले जातात. त्यामुळे बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी वेग आला आहे. गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, कडोलकर गल्ली, रामदेव गल्ली, भेंडीबाजार आदी ठिकाणी गर्दी होत आहे.
लग्नसराईसाठी कपडे, भांड्यांची दुकाने, सोने, चांदी, किराणा दुकानांमध्ये खरेदी होऊ लागली आहे. वाढत्या उन्हामुळे सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत खरेदीला अधिक पसंती दिली जात आहे. तालुक्यातील शिंदोळी व इतर गावांमध्ये महालक्ष्मी यात्रेचे आयोजन केले आहे. त्यामुळे यात्रेच्या खरेदीसाठीही नागरिक सकाळपासूनच दाखल होत आहेत. लग्नसराई व यात्रा-जत्रांसाठी नवीन कपडे खरेदीला अधिक भर दिला जातो. त्यामुळे कपड्यांच्या दुकानांमध्येही गर्दी वाढू लागली आहे.
अक्षय्यतृतीया तोंडावर
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय्यतृतीया तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन खरेदीला ऊत येऊ लागला आहे. त्याबरोबरच इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, घरकुल यांचे आगाऊ बुकिंग केले जात आहे. सोन्या-चांदीचीही खरेदी होऊ लागली आहे. बाजारात विविध प्रकारची फळे दाखल झाली आहेत. त्यामुळे आंब्यांबरोबरच वाढत्या उष्म्याने तहान भागविण्यासाठी फळांचीही खरेदी होऊ लागली आहे. यात्रा-जत्रांसाठी शेळ्या-मेंढ्या आणि कोंबड्यांची खरेदी होत आहे. एकूणच यात्रा-जत्रा आणि लग्नसराईची लगबग पाहावयास मिळत आहे.