For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आधारकार्ड दुरुस्तीसाठी पोस्ट कार्यालयात गर्दी

11:38 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
आधारकार्ड दुरुस्तीसाठी पोस्ट कार्यालयात गर्दी
Advertisement

सातबारा उताऱ्यामध्ये नावात फरक असल्याने शेतकऱ्यांची धावपळ

Advertisement

बेळगाव : सध्या सातबारा उताऱ्याला आधार क्रमांक लिंक करण्याचे काम सुरू आहे.परंतु सातबारा उतारा व आधारकार्डमधील नावात काहीसा फरक असल्यास लिंक करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे उताऱ्याप्रमाणेच आधारकार्डमध्ये नावाची नोंद करण्याची सूचना तलाठ्यांकडून केली जात असल्याने आधारकार्ड दुरुस्ती करण्यासाठी आधार सेवा केंद्रांवर गर्दी होत आहे. प्रत्येक शेतकऱ्याची माहिती प्रशासनाकडे असावी, तसेच सातबारा उताऱ्यांमधील नावांमध्ये फेरफार होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक सातबारा उताऱ्याला जोडला जात आहे. मागील वर्षभरापासून हे काम सुरू होते. यंदा मात्र प्रत्येक गावागावात तलाठ्यांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने ग्राम पंचायत कार्यालय, तसेच इतर सरकारी कार्यालयांमध्ये नोंदणीसाठी गर्दी होत आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांच्या आधारकार्डवर केवळ नाव व आडनाव इतकाच उल्लेख करण्यात आला आहे. परंतु सातबारा उताऱ्यात त्या शेतकऱ्याचे संपूर्ण नाव असल्याने लिंक होताना तांत्रिक अडचणी येत आहेत. लिंक होत नसल्याने अखेर शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्याप्रमाणेच आधारकार्डमध्ये बदल करण्याची सूचना केली जात आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या नावांमध्ये फरक असल्याने त्यांना आधारकार्डमध्ये ऊर्फ असे नमूद करण्याची सूचना अधिकारीवर्गाने केली आहे. कॅम्प येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये आधारकार्ड दुरुस्ती करण्यासाठी गर्दी होत आहे. मुख्य पोस्ट ऑफिसोबतच इतर पोस्ट ऑफिसमध्येही आधार दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.