For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरी

11:36 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरी
Advertisement

महांतेशनगर येथील घटना : साडेसहा लाखांचा ऐवज पळविला : श्वानपथक, ठसेतज्ञांना पाचारण

Advertisement

बेळगाव : भरपावसातही चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत.महांतेशनगर येथील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. रविवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. मार्केटचे एसीपी सोमेगौडा जी. यु., माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुलगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले.

निवृत्त साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव बागोडी यांच्या पीएनटी क्वॉर्टर्ससमोरील घरात चोरीची घटना घडली आहे. महादेव हे राखीव दलाचे निवृत्त साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत. पत्नी व मुलीसमवेत बैलहोंगल तालुक्यातील चिवटगुंडीला मोठ्या मुलीकडे गेले होते. त्यांचा मुलगा जोग धबधबा पाहण्यासाठी गेला होता. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते.

Advertisement

रविवारी पहाटे चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून तिजोरीतील कर्णफुले, अंगठ्या, मंगळसूत्र, नेकलेस, पाटल्या, पोहेहार, चेन, नथ असे एकूण 15 तोळे 9 ग्रॅमहून अधिक सोने, 50 ग्रॅम चांदीची लक्ष्मीमूर्ती व दहा हजार रोख रक्कम असा एकूण साडेसहा लाख रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे. रविवारी सकाळी घरमालकांनी दरवाजा उघडा असल्याचे बघून गावी गेलेल्या महादेव यांना याची माहिती दिली. महादेव व त्यांच्या कुटुंबीयांनी बेळगावला येऊन घरात पाहणी केली असता चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविल्याचे उघडकीस आले. माळमारुती पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे संशयित कैद

पोलिसांनी परिसरातील काही सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहे. मध्यरात्रीनंतर दोघे जण या परिसरात फिरताना फुटेजमध्ये दिसतात. गुन्हेगारांनी आपल्या अंगावर रेनकोट घातल्याचे दिसून येते. एकटा गुन्हेगार बॅटरी मारून प्रत्येक घराच्या दरवाजाची पाहणी करताना दिसतो. सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.