ग्रामीण क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे कडोली येथे थाटात उद्घाटन
वार्ताहर/कडोली
राहुल सतीशअण्णा जारकीहोळी ट्रॉफी 2025 बेळगाव ग्रामीण क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे सोमवारी कडोली येथे थाटात उद्घाटन झाले. येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर काँग्रेस युवा नेता राहुल जारकीहोळी, ग्राम पंचायत उपाध्यक्षा दीपा मरगाळे, ग्राम पंचायत सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बेळगाव ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबले होते. विविध प्रतिमांचे पूजन विविध मान्यवरांनी केले. यावेळी राहुल जारकीहोळी, मलगौडा पाटील, अरुण कटांबले, उदय सिद्दण्णावर यांनी मार्गदर्शन केले. राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते यष्टीचे पूजन झाल्यानंतर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला क्रिकेट संघाचे खेळाडू, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्तविक आणि आभारप्रदर्शन राजू मायण्णा यांनी केले.