ग्रामीण क्रीडापटुंना प्रोत्साहन जरुरीचे
खा. प्रियांका जारकीहोळी; नागनूरात खो-खो स्पर्धा
बेळगाव : ग्रामीण भागातील क्रीडापटू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावेत व त्यांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी सरकार आणि संघसंस्थांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केली. जिल्हा पंचायत, शालेय शिक्षण खाते उपसंचालक कार्यालय मुडलगी, महालिंगेश्वर शिक्षण संस्था नागनूर यांच्या संयुक्त सहकार्याने प्राथमिक व माध्यमिक शाळा विद्यार्थ्यांच्या 14 ते 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा नागनूर (ता. मुडलगी) येथे झाल्या. स्पर्धांचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष बसनगौडा पाटील अध्यक्षस्थानी होते. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी ग्रामीण भागातील क्रीडापटुंना प्रोत्साहन देण्यासाठी सतीश शुगर्स पुरस्कारांतर्गत क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रासाठी भरीव कार्य केले आहे.
ग्रामीण क्रीडापटुंनी विविध खेळांमध्ये भाग घेऊन शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुऊस्त बनावे. देश-विदेशात होणाऱ्या खेलो इंडिया, ऑलिंपिक यासारख्या क्रीडास्पर्धांत चमक दाखविल्यास शिष्यवृत्ती, राज्य, केंद्र सरकारात नोकरीसह अन्य सुविधाही मिळणार असल्याचे खासदार जारकीहोळी यांनी सांगितले. नागनूरच्या महालिंगेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बसनगौडा पाटील, खासदार प्रियांका जारकीहोळी, निवृत्त शिक्षणाधिकारी गजानन मण्णीकेरी, गटशिक्षण अधिकारी प्रकाश हिरेमठ, प्रशिक्षक इरण्णा हळीगौडर, राज्यस्तरीय पुरस्कार विजेते एम. बी. देसाई, निवृत्त क्रीडाशिक्षक के. सी. इट्टीगुडी आदिंचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.