Crime News : पोलीस असल्याचे सांगून दिवसा ढवळ्या 2 लाखाचा गंडा, आटपाडीतील प्रकार
'तुमच्या जवळील दागिने काढून खिशात घालून घेऊन जावा'
आटपाडी : पोलिस असल्याचे सांगत सोन्याची चेन आणि अंगठी घेवुन 1 लाख 80 हजाराचा गंडा घालण्याचा प्रकार शनिवारी आटपाडीमध्ये घडला. आटपाडी तालुक्यातील यपावाडी येथील नारायण तातोबा चव्हाण (वय 76) यांची आटपाडी येथे एचपी पेट्रोल पंपालगत दोघांनी दिवसा ढवळ्या फसवणुक केली.
यपावाडी येथील प्रगतशील डाळिंब उत्पादक नारायण चव्हाण हे आटपाडी येथील भिवघाट रोडवर पेट्रोल पंपावरून पुन्हा गावात आटपाडीकडे येत होते. पेट्रोल पंपापासून शंभर मीटर अंतरावर दोन अनोळखी इसमांनी त्यांना थाबंविले. आम्ही पोलिस आहोत. पुढे लुटालूट सुरू आहे. तुमच्या जवळील दागिने काढून खिशात घालून घेऊन जावा, असे त्या दोघांनी सांगितले.
नारायण चव्हाण तोतया पोलीसांचे ऐकुन आपल्याजवळील सोन्याची चेन व अंगठी काढून रूमालात बांधत होते. दोघांपैकी एकाने मी तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो, असे म्हणून हातचलाखी करत चव्हाण यांच्याकडुन चेन व अंगठी असलेला रूमाल घेतला. दागिने गायब करून रूमालात लहान दगड ठेवून तब्बल 1 लाख 80 हजाराचा गंडा घालुन धुम ठोकली.
आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नारायण चव्हाण यांनी आटपाडी पोलीसात फिर्याद दिली. दोघा अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे करत आहेत.