रन वे सज्ज, झेप घेणे बाकी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युवकांना आवाहन : हुबळीत 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन
वार्ताहर /हुबळी
तुमच्या टेक ऑफसाठी रन वे तयार आहे. विकासाच्या क्षितिजाकडे युवकांनी झेपावणे बाकी आहे. हे शतक तुमच्यासाठी आहे. तुमची कामगिरीच भारताला जागतिक स्तरावर चमकवेल. उद्योजकांचे लक्ष तुमच्यावर केंद्रीत आहे. ही एक ऐतिहासिक वेळ आहे. राष्ट्राचे नेतृत्त्व करण्यात महिला शक्ती यशस्वी झाली आहे. फायटर जेट उडविणाऱ्या महिला विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा यासह सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
हुबळीच्या रेल्वे मैदानावर 12 ते 16 जानेवारी या कालावधीत आयोजित 26 व्या राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमाचे गुरुवारी उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. तरुणांनी वर्तमानात राहून भविष्याचा सकारात्मक विचार करावा. यातून नवनवीन अविष्कारांकडे लक्ष केंद्रीत करावे. आज तरुणांसमोर अनेक मोठमोठ्या संधी आहेत. जलदगतीने बदलणाऱ्या काळात युवकांनी वैयक्तिक कामगिरीबरोबरच नवनिर्मिती करून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.
देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे उद्दिष्ट
जागतिक स्तरावर गणितापासून विज्ञानापर्यंतच्या कोणत्याही स्पर्धेत भारतीयांचे यश अनन्यसाधारण आहे. ते भारताच्या युवा शक्तीचे प्रतीक आहे. पुढील 25 वर्षांत युवाशक्ती ही भारतासाठी मार्गदर्शी असेल. आपले विचार आणि प्रयत्न सकारात्मक असले पाहिजेत. जग भारताकडे आशेच्या भावनेने बघत आहे. यामागे तऊणांची मेहनत आहे. भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. आमचे उद्दिष्ट देशाला तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
कृषी क्षेत्रात भारत जगात आघाडीवर असून या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर केल्यास तऊणांना अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. भारत क्रीडा क्षेत्रात चमकण्यामागचे कारण म्हणजे युवा समाजाचे प्रयत्न होय, असेही त्यांनी सांगितले.
विवेकानंदांचे कर्नाटकाशी अतूट नाते
स्वामी विवेकानंद यांचा कर्नाटकाशी अतूट नाते होते. त्यांनी बेंगळूर, हुबळी-धारवाडमध्ये दौरा केला होता. म्हैसूरच्या महाराजांनी विवेकानंदांना शिकागो येथील धर्मपरिषदेला जाण्यासाठी मदत केली होती. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ निर्माण करण्याच्या नव्या निर्धाराने देश पुढे वाटचाल करीत आहे. युवाशक्ती प्रबळ असेल तर ती सशक्त देश घडवण्यास मदत करेल, असा विश्वास स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केला होता, असेही मोदी म्हणाले.
राणी चन्नम्मा यांनी कठीण काळातही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. संगोळ्ळी रायण्णा यांच्या शौर्याने इंग्रजांचे धाबे दणाणले. अशा महान व्यक्तींची देशभक्ती आपल्यासाठी आदर्श आहे.
कार्यक्रमप्रसंगी राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर, प्रल्हाद जोशी, निसीत प्रमाणिक, राज्याचे मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प, डॉ. के. सी. नारायणगौडा, हालप्पा आचार, सी. सी. पाटील, विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, आमदार अरविंद बेल्लद, अमृत देसाई, विधानपरिषद सदस्य एस. व्ही. संकनूर, हुबळी-धारवाडचे महापौर इरेश अंचटगेरी आदी उपस्थित होते.
देशाला विकासाच्या क्षितीजाकडे घेऊन चला!
डिजिलट इंडियाच्या सध्याच्या युगात कुशल तरुणांसाठी संधीची दारे खुली झाली आहेत. उठा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका, असा स्वामी विवेकानंद यांचा मंत्र नजरेसमोर देशाला विकासाच्या क्षितीजाकडे घेऊन जाण्यासाठी एकत्र या, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना केले.
रोड शो वेळी सुरक्षा व्यवस्था भेदून युवक रस्त्यावर
राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो वेळी सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी दिसून आली. हुबळी विमानतळापासून रेल्वे मैदानापर्यंत रोड शोवेळी एक युवक बॅरिकेड्स ओलांडून मोदींना हार घालण्यासाठी रस्त्यावर धावून आला. ही बाब लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी युवकाला बाजूला केले. या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.