ईडन गार्डन्सवर धावांची बरसात
अखेरच्या षटकात लखनौचा केकेआरवर 4 धावांनी विजय : सामनावीर निकोल्स पूरनची 87 धावांची खेळी
वृत्तसंस्था/ कोलकाता
यंदाच्या आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या आणखी एका रोमांचक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने शेवटच्या षटकात कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी पराभव केला. ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात साडेचारशेहून अधिक धावा झाल्या. प्रथम फलंदाजी करताना लखनौने निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर 238 धावांचा मोठा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, केवळ 14 षटकांत 166 धावा करून विजयाकडे वाटचाल करत असलेला कोलकाता शेवटच्या षटकांत ट्रॅकवरून बाहेर पडला आणि 20 षटकांत फक्त 234 धावाच करु शकला. या सामन्यात एकूण 45 चौकार, 25 षटकार पाहायला मिळाले आणि 472 धावा झाल्या.
कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. सलामीवीर मार्श आणि पूरन यांच्या शानदार फलंदाजीमुळे लखनौला मोठी धावसंख्या उभारता आली. त्याआधी एडेन मार्करम आणि मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी हर्षित राणाने मार्करमला आऊट करत फोडली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या मार्करम 47 धावा करुन बाद झाला.
ईडन गार्डन्सवर मार्श-पूरनचे वादळ
मार्करम बाद झाल्यानंतर मार्शने तुफानी खेळी साकारताना 48 चेंडूत 81 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार व 5 षटकार लगावले. मार्श व पूरन या दोघात दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी झाली. ही जोडी जमलेली असताना मार्श 81 धावा काढून माघारी परतला. मार्श बाद झाल्यानंतर, पूरनने आक्रमक फलंदाजी केली आणि फक्त 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पूरन शेवटपर्यंत राहिला पण त्याचे शतक पूर्ण करु शकला नाही. पूरनने 36 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 87 धावा काढत नाबाद राहिला. ज्यामुळे लखनौने 20 षटकांत 3 गडी गमावून 238 धावा केल्या. केकेआरकडून हर्षित राणाने दोन, तर आंद्रे रसेलने एक विकेट घेतली.
रहाणे एकटा नडला...
लखनौने दिलेल्या 239 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात दणक्यात झाली. केकेआरने पॉवरप्लेमध्ये 80 धावा केल्या. क्विंटन डिकॉक 15 धावा करत बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेन यांनी संघाला सावरले. ही जोडी जमलेली असताना नरेन 30 धावा करत बाद झाला. नरेन बाद झाल्यानंतर, वेंकटेश अय्यर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी जबाबदारी सांभाळली. यादरम्यान, शार्दुलने 13 व्या षटकात 5 वाईड बॉल टाकले, पण त्याच षटकात त्याने रहाणेला 61 धावांवर बाद केले आणि दोघांमधील 71 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. रहाणेने कर्णधाराला साजेशी खेळी करत 35 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह सर्वाधिक 61 धावांचे योगदान दिले. तर वेंकटेश अय्यरने 29 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारासह 45 धावा केल्या.
रहाणे बाद होताच केकेआरच्या विकेट पडत राहिल्या. रमणदीप, अंगक्रिश आणि रसेल खूपच स्वस्तात बाद झाले. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिंकू सिंगने 15 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारासह 38 धावांची वादळी खेळी केली पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. केकेआरला घरच्या मैदानावर 7 गडी गमावत 234 धावापर्यंत मजल मारता आली. लखनौने हा सामना चार धावांनी जिंकत आपल्या तिसऱ्या विजयाची नोंद केली.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 3 बाद 238 (मॅरक्रम 47, मिचेल मार्श 81, निकोल्स पूरन नाबाद 87, अब्दुल समाद 6, डेव्हिड मिलर नाबाद 4, हर्षित राणा 2 तर आंद्रे रसेल 1 बळी)
केकेआर 20 षटकांत 7 बाद 234 (डिकॉक 15, सुनील नरेन 30, अजिंक्य रहाणे 61, वेंकटेश अय्यर 45, रिंकू सिंग नाबाद 38, हर्षित राणा नाबाद 10, आकाश दीप व शार्दुल ठाकूर प्रत्येकी दोन बळी, आवेश खान, दिग्वेश राठी व रवि बिश्नोई प्रत्येकी एक बळी)