आजपासून आयपीएलचा ‘रन’संग्राम
चेन्नई सुपर किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यातील लढतीने 17 व्या आवृत्तीस प्रारंभ, नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडची कसोटी लागणार
वृत्तसंस्था /चेन्नई
चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील आज शुक्रवारी येथे होणारा सामन्याने ‘आयपीएल 2024’चा प्रारंभ होणार असून त्याचबरोबर विद्यमान विजेत्यासाठी ही नवीन पहाट देखील ठरेल. कारण चेन्नईचे नेतृत्व एम. एस. धोनीकडून ऋतुराज गायकवाडकडे सोपविण्यात आले आहे. धोनी या मोसमाच्या अखेरीस निवृत्त होण्याची शक्यता आहे आणि ‘आयपीएल’चा नवीन हंगाम सुरू होण्याच्या एक दिवस आधी सुरळीत संक्रमणासाठी हे अनपेक्षित पाऊल उचलले गेले आहे, असे दिसते. परंतु नेतृत्व बदलाच्या पलीकडे सीएसके आणि आरसीबीला काही गहन प्रश्ऩांची उत्तरेही शोधावी लागतील. सुपर किंग्ज हे पाच वेळचे विजेते आहेत आणि सहावे विजेतेपद त्यांना अशा जागी पोहोचवेल जिथे आतापर्यंत कोणताही संघ पोहोचलेला नाही. अगदी मुंबई इंडियन्स देखील नाही, ज्यांच्याकडे पाच आयपीएल किताब आहेत. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स, ज्यांनी अलीकडेच महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले आहे, ते त्यांच्या नावावर पहिले आयपीएल जेतेपद जोडण्यास उत्सुक असतील. तथापि, त्यांना त्यासाठी अनेक आव्हानांवर मात करावी लागेल.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये जोरदार यश मिळविलेले असले, तरी त्याची आयपीएल कारकीर्द अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कर्णधार म्हणून त्याची बुद्धी अजूनही तल्लख असली, तरी वाढत्या वयाने त्याच्या फलंदाजील हालचालींवर परिणाम केलेला आहे. त्यामुळे तऊणांना पुढे आणावे लागले असून सीएसकेने डेव्हॉन कॉनवेच्या अनुपस्थितीत रचिन रवींद्रवर प्रचंड विश्वास ठेवला आहे. कॉनवे अंगठ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या सुऊवातीच्या भागाला मुकणार आहे. सीएसकेकडे डॅरिल मिशेलच्या रुपाने आणखी एक किवी फलंदाज आहे, जो मधल्या फळीत येऊन फटकेबाजी आणि प्रसंगी मध्यमगती गोलंदाजीही करू शकतो. फलंदाजीत त्यांचा भर अजिंक्य रहाणेच्या अनुभवावर आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक धावा केलेल्या सलामीवीर गायकवाडवर असेल. प्रत्येक हंगामात चाहत्यांच्या ज्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा असतात त्या सीएसके संघाचे नेतृत्व तो कसे हाताळतो ते पाहावे लागणार आहे.
तथापि, गायकवाडच्या हातात एक विजयाचा फॉर्म्युला आहे, जो धोनीने वर्षानुवर्षे यशस्वीपणे वापरला आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू आणि फिरकीपटू चिदंबरम स्टेडियमवरील खेळपट्टीचा प्रभावीरीत्या वापर करू शकतात. रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोईन अली, महीश थिक्षानासारखे फिरकीपटू प्रतिस्पर्ध्यांना भरपूर सतावू शकतात. त्याशिवाय सीएसकेकडे दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर हे दोन वेगवान गोलंदाज आहेत. तथापि, श्रीलंकेचा मथीशा पाथिराना बांगलादेशविऊद्धच्या अलीकडील टी-20 मालिकेदरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरल्याने सुऊवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. परंतु म्हणून आरसीबीसमोरील आव्हान हलके होणार नाही. 2008 पासून या ठिकाणी आरसीबीला सीएसके संघास पराभूत करता आलेले नाही. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या खांद्यांवर पुन्हा एकदा ‘आरसीबी’च्या फलंदाजीची जबाबदारी राहील. यावेळी जोडीला कॅमेरॉन ग्रीन असल्याने त्यांना दिलासा मिळेल. कारण डू प्लेसिस वा विराट यापैकी एक किंवा दोघेही अयशस्वी झाल्यास ग्रीन मदतकारी ठरू शकतो. तसेच तो गोलंदाज म्हणूनही योगदान देऊ शकतो. त्यानंतर त्यांच्याकडे मॅक्सवेल आहे. त्याचा गेल्या वर्षीच्या विश्वचषकातील धडाका कुणी विसरलेला नाही. सिराज, फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, आकाश दीप आणि रीस टोपले अशी वेगवान गोलंदाजांची चांगली फळी त्यांच्याकडे आहे. लेगस्पिनर हसरंगाच्या अनुपस्थितीत त्यांचा फिरकी मारा मात्र प्रभावी दिसत नाही. हसरंगाला मुक्त केल्यामुळे आरसीबीला मॅक्सवेलच्या ऑफस्पिनचा आधार घ्यावा लागेल.
ऋतुराज गायकवाड सीएसकेचा नवा कर्णधार, धोनीचा राजीनामा : सीएसके प्रशासनाकडून माहिती
इंडियन प्रीमियर लीग सुरु होण्याच्या एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्सने कर्णधार बदलण्याची घोषणा केली आहे. संघाला 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी 27 वर्षीय युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड संघाची धुरा सांभाळणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना शुक्रवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई आणि बेंगळूर यांच्यात होणार आहे. कॅप्टन्सच्या फोटोशूटनंतर चेन्नई संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेटवर स्वत:चा ठसा उमटवणारा धोनी हा कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यावर आहे. या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्याआधीच त्याने राजीनामा दिला आहे. ही आयपीएल 42 वर्षीय धोनीची शेवटची स्पर्धा असेल. आयपीएल 2022 च्या स्पर्धेच्या आधी देखील धोनीनं सीएसकेच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. मात्र, संघाच्या खराब कामगिरीमुळे पुन्हा एकदा धोनीनं सूत्रे हाती घेतली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने जोरदार पुनरागमन केलं आणि आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. धोनीच्या कुशल नेतृत्वाखाली सीएसकेने आयपीएलची पाच विजेतेपदे पटकावली आहेत.
ऋतुराज गायकवाडला क्रिकेटच्या सर्वच
फॉरमॅटचा अनुभव आहे. कसोटी क्रिकेटही तो खेळला आहे. 2021 च्या आयपीएलमध्ये ऋतुराजने सीएसकेकडून खेळताना सर्वाधिक 635 धावा कुटल्या होत्या. त्याच्या कामगिरीने धोनीही प्रभावित झाला होता. तेव्हाच 27 वर्षीय ऋतुराजला पुढील मोठ्या जबाबदारीचे संकेत देण्यात आले होते. आता, ऋतुराजच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सीएसके-ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशिद, मिचेल सँटनेर, एन. सिंधू, प्रशांत सोळंकी, महीश थिक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकुर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रेहमान आणि अवनीश राव अरावेल्ली.
आरसीबी-फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग आणि सौरव चौहान.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ सिनेमा अॅप