For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राममंदिर प्रतिमेच्या नोटांचे वृत्त निराधार!

06:05 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
राममंदिर प्रतिमेच्या नोटांचे वृत्त निराधार
Advertisement

रिझर्व्ह बँकेकडून स्पष्टीकरण : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भगवान रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त, प्रभू रामचंद्र आणि अयोध्येतील राममंदिर यांची प्रतिमा मुद्रित केलेल्या 500 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे वृत्त रिझर्व्ह बँकेने फेटाळले आहे. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच अशा नोटा कोणाकडूनही घेऊ नयेत, असे आवाहनही रिझर्व्ह बँकेने केले आहे.

Advertisement

अयोध्येच्या राममंदिरात भगवान रामलल्लांच्या मूर्तीची ‘प्राणप्रतिष्ठा’ 22 जानेवारीला केली जाणार आहे. यानिमित्त रिझर्व्ह बँक प्रभू रामचंद्र आणि राममंदिर यांच्या प्रतिमा मुद्रित केलेल्या नोटा चलनात आणणार आहे, असे वृत्त सोशल मीडियावर वेगाने पसरले आहे. तसेच या नोटांची छायाचित्रेही प्रसारित करण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक लोकांना हे वृत्त खरे वाटण्याची शक्यता आहे. तथापि, त्यावर विश्वास ठेवू नये. रिझर्व्ह बँकेची अशी कोणतीही योजना नाही. तसेच या नोटांची प्रसारित होत असलेली चित्रेही बनावट आहेत. सर्व लोकांनी या अफवांपासून सावध रहावे, असे स्पष्ट प्रतिपादन रिझर्व्ह बँकेने केले आहे.

रचनाकाराकडूनही नकार

या कथित नोटांची चित्रे ‘एक्स’ या सोशल मीडिया वेबसाईटवर राघून मूर्ती यांनी प्रथमत: प्रसारित केल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर अनेकांनी ती आपल्या परिचितांना पाठविल्याने त्यांचा झपाट्याने प्रसार झाला. तथापि, आपण केवळ आपल्या कल्पनेतून या नोटांची रचना केली होती. मात्र, कोणीतरी खोडसाळपणा करून एक्स या माध्यमावर ती प्रसारित करून गोंधळ उडवून दिला आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये. भ्रमित करणाऱ्या अशा वृत्तांना माझा कोणताही पाठिंबा नाही. मी केवळ माझ्या कल्पनेचा आविष्कार म्हणून हे काल्पनिक डिझाईन तयार केले होते, अशी स्पष्टोक्ती राघून मूर्ती यांनी शुक्रवारी केली आहे.

Advertisement
Tags :

.