एजीटीची नियमावली, नेमणूक रखडली
शाळांमध्ये अतिथी शिक्षक मिळणे कठीण : शैक्षणिक प्रगतीवर परिणाम
बेळगाव : सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने अतिथी शिक्षक नेमणूक केली जात आहे. परंतु, माध्यमिक शाळांवर अतिथी शिक्षकांची नेमणूक करताना अनेक अडचणी येत आहेत. माध्यमिक शाळांसाठी असिस्टंट ग्रॅज्युएट टीचर (एजीटी)ची नियमावली असल्यामुळे पदवीधर शिक्षक मिळताना शाळांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या नियमावलीत बदल करून ज्या ठिकाणी एजीटी शिक्षक नसेल, त्या ठिकाणी पीएसटी शिक्षक नेमण्यासाठी प्रयत्न करावेत. बेळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 4,484 अतिथी शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच शाळानिहाय यादी जाहीर करण्यात आली. पहिली ते पाचवीसाठी बारावी करून डीएड् केलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जात आहे. परंतु, पाचवी ते आठवीसाठी शिक्षण विभागाने एजीटी शिक्षक सक्तीचे केले आहेत. विशेषत: विज्ञान व गणित विषयांसाठी एजीटी शिक्षक मिळत नसल्याने अतिथी शिक्षकपद रिक्त राहण्याची शक्यता आहे.
ग्रामीणमध्ये अतिथी शिक्षक मिळत नसल्याची तक्रार
गणित व विज्ञान पदवीधर शिक्षकांना इतर ठिकाणी कायमस्वरुपी नोकरी असल्याने अतिथी शिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. शहरी भागात हायस्कूलसाठी अतिथी शिक्षक मिळत असले तरी ग्रामीण भागात मात्र अतिथी शिक्षक मिळत नसल्याची तक्रार शिक्षकांकडून होत आहे. याचा परिणाम एकूणच शैक्षणिक प्रगतीवर होताना दिसत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील बेळगाव शहर विभागात 12, बेळगाव ग्रामीण 23 तर खानापूरमध्ये 25 माध्यमिक शाळांसाठी अतिथी शिक्षक भरावयाचे आहेत.
अतिथी शिक्षक मिळत नसल्याने शिक्षकही हतबल
पदवीधर अतिथी शिक्षक मिळत नसल्याने शाळा शिक्षकही हतबल आहेत. त्यामुळे नियमावलीत काहीसा बदल करून ज्या ठिकाणी एजीटी शिक्षक मिळत नसतील त्या ठिकाणी पीएसटी अतिथी शिक्षकांची नेमणूक केल्यासच पदे भरणे शक्य आहे. अन्यथा हायस्कूलमधील अनेक अतिथी शिक्षक पदे रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.