नियम धाब्यावर, 26 हजार वाहनधारकांना दणका
कोल्हापूर / विनोद सावंत :
नियम धाब्यावर बसविणाऱ्या वाहनधारकांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकाने वर्षभरात तब्बल 26 हजार 386 वाहनधारकांवर कारवाई केली आहे. यामध्ये विविध कारवाईतून 15 कोटी 84 लाखांचा दंडही वसुल केला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कारवाई हेल्मेटचा वापर नसणाऱ्यांवर केली आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) वाहतुकीची नियमावली केली आहे. शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतुकीसाठी दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहन चालकांनी याचे पालन करणे बंधनकारक आहे. वारंवार यासंदर्भात आरटीओ विभाग जनजागृत्ती करते. परंतू काही वाहनधारक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवितात. यामध्ये त्यांचेही नुकसान होतेच शिवाय त्याच्यासोबत प्रवास करणारे आणि पादचारीचेही फटका बसतो. यामुळे आरटीओ विभागाने नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशान नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. आरटीओ विभागाने यासाठी विशेष भरारी पथकही नेमले आहे. या पथकाने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षात नियम पायदळी तुडविणाऱ्या 26 हजार 386 वाहनधारकांवर कारवाई केली. वाहन चालविताना मोबाईल, हेल्मेटचा वापर करणे, चार चाकीमध्ये प्रवास करताना सीट बेल्ट न लावणे, वाहनाचा विमा न उतरविणे, वाहनांना रिफलेक्टर न लावणे अशा कारवाईचा यामध्ये समावेश आहे.
भरारी पथक अॅक्शन मोडवर
आरटीओ विभागाचे भरारी पथक अॅक्शनमोडवर आहे. त्यांनी मे 2023 मध्ये सर्वाधिक 4711 कारवाई केल्या आहेत. यामध्ये केवळ 3741 कारवाई हेल्मेट शिवाय वाहन चालविणाऱ्यावर झाल्या आहेत. त्या खालोखाल सप्टेंबर 2023 मध्ये 3443 कारवाई झाली आहेत.
94 हजार वाहनांची तपासणी
आरटीओच्या भरारी पथकाने गत आर्थिक वर्षात 94 हजार 223 वाहनांची तपासणी केली आहे. 24 हजार 89 वाहनधारकांवर नियमांचा भंग केल्यावरून कारवाई केली असून 15 कोटी 84 लाखांचा दंडही वसुल केला आहे.
असा आहे दंड
हेल्मट नसणे -500
सीट बेल्ट नसणे-1 हजार
मोबाईल वापर -1 हजार
विमा नसणे- 2 हजार 300
रिफलेक्टर नसणे-1 हजार
कारवाईचा प्रकार दंड झालेले वाहनधारक संख्या
हेल्मेट शिवाय वाहन चालविणे 14161
सीट बेल्ट शिवाय वाहन चालविणे 1619
वाहन चालवताना मोबाईलचा वापर 1619
विमा नसणारे वाहन 7102
रिफलेक्टर नसणे 1745
एकूण कारवाई 26386
नियम धाब्यावर बसवून वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी आरटीओकडून 9 भरारी पथक नियुक्त केली आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्यात फिरून संबंधितांवर कारवाई केली जात आहे. अपघातांची संख्या कमी व्हावी तसेच रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही मोहीम राबविले जाते. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करून सहकार्य करावे.
चंद्रकांत माने, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी