चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू
कोल्हापूर :
चिमगाव ता. कागल येथे नातलगानी आणून दिलेला केक खाल्यानंतर विषबाधा होऊन भावा- बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कु. श्रीयांश रणजीत आंगज (वय 4 वर्षे ) आणि कु. काव्या रणजित आंगज (वय 7 वर्षे ) अशा मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत मुरगुड पोलीस ठाण्यात झाली नव्हती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून चिमगाव ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे .
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चिमगाव येथील रणजित आंगज यांचे घरी नातेवाईकांनी आणलेला केक त्यांचा चार वर्षाचा मुलगा श्रीयांश व सात वर्षाची मुलगी काव्या यांनी खाल्ला. त्यानंतर त्यांना उलट्या होवू लागल्या . तेंव्हा आंगज यांनी या दोन्ही मुलांना मुरगूडच्या खाजगी दवाखान्यात दाखवून औषधोपचार केले. पण मुलगा श्रीयांशची तब्येत आणखीन खालावल्याने त्याचा मंगळवारी सकाळी दुदैवी मृत्यू झाला. त्याच्यावर चिमगाव येथे अंत्यसंकार करण्यात आले .
दरम्यान, आंगज यांनी मुलगी काव्या हिला अत्यवस्थ अवस्थेत कोल्हापूरच्या खाजगी दवाखान्यात नेले. पण मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उपचारादरम्यान तीचाही मृत्यू झाला . लहान बहिण भावांचा असा करुण अंत झाल्याने चिमगाव ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे.
रणजित आंगज हे मुलांसह पुण्यात रहात होते. कंपनीने त्यांना ब्रेक दिल्याने ते आपल्या चिमगाव गावी सहा महिन्यापासून राहण्यास आले होते. ते मुरगूडच्या एका खाजगी दवाखान्यात काम करीत होते. त्यांचा मुलगा श्रीयांशला अंगणवाडीत तर मुलगी काव्या चिमगावच्या प्राथमिक शाळेत शिकत होती.
नातेवाईकांनी आणलेला केक या चिमुकल्यांच्या जीवावर उठला. आणि केकमधून त्यांना विषबाधा झाली. मुलांच्या पोटात दुखू लागल्याने व उलट्या होवू लागल्याने वडिल रणजित आंगज यांना केक वरील अंतिम तारीख कालबाह्य झाल्याचे लक्षात आले.
मुलांच्या दुदैवी मृत्यूने त्यांचे आईवडिल गर्भगळीत झाले होते . घटना घडताच आंगज यांच्या घरी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.