हुबळी पोलीस स्थानकावरील हल्ल्यातील गुन्हेगारांना शासन करा
बेळगाव : एका व्हॉट्सअॅप पोस्टचे कारण पुढे करून एका समाजाच्या लोकांनी हुबळी येथे पोलीस स्थानकावर हल्ला करून पोलिसांनाच मारहाण केली. त्यांच्या गाड्या जाळल्या व प्राणघातक हल्ला केला. सरकार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांच्यावरील खटला मागे घेत आहे. हे अत्यंत निषेधार्ह असून गुन्हेगारांना शासन करावे, अशा मागणीचे निवेदन नागरिक हितरक्षण समितीसह विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, सरकारी अधिकारी किंवा सरकारी कार्यालयांवर आक्रमण करणे, हल्ला करणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु मतांच्या तृष्टीकरणासाठी सरकार हे खटले मागे घेण्याचा प्रयत्न करत आहे. या कृतीमुळे पोलिसांचे मनोधैर्य खचणार आहे व जनतेचा कायदा सुव्यवस्थेवरील विश्वास उडणार आहे. व समाजाची सुरक्षितता धोक्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे खटले मागे घेऊ नयेत. एकीकडे हिंदूंच्या कार्यक्रमांना शेकडो नियम लावले जातात. तर दुसरीकडे अन्य समाजांच्या लोकांचे तृष्टीकरण केले जाते. सरकारच्या हिंदूविरोधी नितीचा आम्ही निषेध करत असून सरकारने हे खटले मागे घेण्याचा निर्णय स्थगित करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.