पूर्वमोसमीचा रुद्रावतार
नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचा प्रवास प्रगतिपथावर असतानाच पूर्वमोसमी पावसाने महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यापासून ते आसामपर्यंत काही राज्यांना दिलेला तडाखा अभूतपूर्वच म्हणायला हवा. मान्सूनच्या आधीचा पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस होय. दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात ही प्रारंभीची झड होतच असते. किंबहुना, यंदा तिची तीव्रता आणि झंझावात काही औरच होता, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. मान्सूनचे या वर्षी नियोजित वेळेआधीच म्हणजे 16 मे रोजीच अंदमान व निकोबार बेटावर आगमन झाले. त्यानंतरचा त्याचा प्रवासही निर्विघ्नपणे सुरू असल्याचे पहायला मिळते. मान्सून साधारणपणे 1 जूनपर्यंत केरळात, तर 7 जूनपर्यंत कर्नाटकसह तळकोकणात दाखल होत असतो. 15 जूनपर्यंत तो महाराष्ट्र, तर 15 जुलैपर्यंत सबंध देश व्यापतो. अर्थात या वेळापत्रकात कमी अधिक प्रमाणात बदल हे होतच असतात. किंबहुना, चालू वर्षी पाऊस वेळेआधीच सक्रिय होत असल्याचे दिसत असून, केरळात तो 27 मे, तर महाराष्ट्रात 2 जूनच्या आसपास येईल, अशी अपेक्षा आहे. या दिशेने त्याची वाटचाल होत असतानाच अवचित पूर्वमोसमीने तडाखा द्यावा नि पीकपाण्यासह सारे जनजीवन विस्कळित व्हावे, हे धास्ती वाढविणारेच ठरावे. महाराष्ट्रातील सांगली व सोलापूर हे वास्तविक अवर्षणग्रस्त जिल्हे मानले जातात. त्या भागातच पावसाचा असा रुदावतार पहायला मिळाला, हे दुर्मीळच चित्र म्हणावे लागेल. सांगलीत 61 मिमी पाऊस व्हावा, जतसारख्या दुष्काळी म्हणून गणल्या जाणाऱया व पाण्याचे दुर्भीक्ष्य असणाऱया भागात तब्बल 93 मिमी पावसाची नोंद व्हावी, हे सारेच अचंबित करणारे होय. याशिवाय कोल्हापुरात 51, चंदगडमध्ये 68 तसेच सातारा व सोलापुरातही 30 ते 40 मिमी पाऊस नोंदविला गेल्याचे दिसत आहे. खरे तर उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या जनमानसाकरिता पाऊस हा दिलासाच असतो. परंतु, सरत्या आठवडय़ातील हा पाऊस याला अपवाद ठरला, असे म्हणता येईल. या पावसाने सोलापुरातील पंढरपूर, बार्शी, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट परिसरातील डाळिंब, द्राक्ष, केळीसह काढणीस आलेल्या कांदा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले. सांगली पट्टय़ाला अर्धा अधिक दिवस सलग पावसाला सामोरे जावे लागले. पावसाची सतत अवकृपा राहणाऱया जतसारख्या भागात तर नद्यानाले दुथडी भरून वाहताना दिसले. हे चित्र काहीसे सुखावणारे असले, तरी वादळी वाऱयासह व ढगांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसाने काही ठिकाणी पशुधनाचीही हानी केली. कोकणात यंदा तसा आंब्याचा हंगाम विलंबाने सुरू झाला. त्यामुळे तो लांबणेही स्वाभाविक. मात्र, पावसाने दणका दिल्याने उर्वरित आंबा वाया जाणार, हे वेगळे सांगायला नको. सबंध महाराष्ट्राचा विचार करता रत्नागिरी, सिंधुदुर्गपासून ते परभणी, अकोल्यापर्यंत अनेक जिल्हय़ांत पर्जन्यवृष्टीची नोंद झाल्याने पपई, लिंबू, केळी, शेवगा व इतर पिकांना चांगलाच फटका बसल्याने पावसाळय़ाच्या नियोजनात गुंतलेल्या बळीराजावर हंगामापूर्वीच डोक्याला हात लावण्याची वेळ आलेली दिसते. उत्तर कर्नाटकच्या भागात हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने त्याच्या प्रभावामुळे कर्नाटकसह दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण कोकणात जोरदार पाऊस पडल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. अर्थात पुढच्या टप्प्यात सर्व शक्याशक्यता गृहीत धरून अधिकची काळजी घ्यावी लागेल. मान्सूनच्या आगमनास आणखी दहा, बारा दिवस असले, तरी पूर्वमोसमी काही भागांत दणका देऊ शकतो, हे लक्षात घेऊन पुढचे नियोजन करायला हवे. त्याचबरोबर शेतीपूर्व कामांना गती द्यावी लागेल. हवामान आणि चढ उतार हे एक समीकरणच बनले आहे. मान्सूनचे नियोजित वेळेआधी आगमन झाल्यानंतर त्यात मोठा खंड पडणे, त्यामुळे दुबार व तिबार पेरणीचे संकट उद्धवणे, यातून अनेकदा शेतकऱयांना जावे लागले आहे. यंदाच्या वर्षी हवामान विभागाने सरासरीच्या 99 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाज सुखावणाराच म्हणायचा. तरीही पावसाच्या प्लस, मायनस व मध्यम अशा वेगवेगळय़ा अवस्थांकडे लक्ष देऊन शेतीचे उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा लागेल. पावसाळय़ात महापूर, भिंती खचणे, दरडी कोसळणे, अशा विविध संकटांनाही सामोरे जावे लागते. कोल्हापूर, चिपळूण, सांगलीसारख्या शहरांना पुराने दिलेला वेढा ही अलीकडचीच उदाहरणे होत. नदीकाठांवरील इतर शहरांची अवस्थाही फार वेगळी नाही. ढगफुटीसदृश पाऊस, रस्त्यांची कामे, नैसर्गिक प्रवाहांमध्ये उभारलेले अडथळे याचे परिणाम काय असतात, हे अलीकडे आपण अनुभवले आहे. हे बघता या आघाडीवर दक्ष रहायला हवे. पुराची आपत्ती कशी टाळता वा कमी करता येईल, यासाठी आत्तापासून प्लॅन तयार हवा. आसामसारख्या राज्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू आहे. त्यात तेथील 29 जिल्हय़ांतील तब्बल 7 लाख 17 हजार लोक बाधित झाले आहेत. पूर आणि भूस्खलनात आत्तापर्यंत राज्यात 9 जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. ही सारी धोक्याची घंटा म्हणता येईल. मोसमी पाऊस हे भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशाला मिळालेले वरदान आहे. आजही देशातील 60 ते 65 टक्के लोकसंख्या या पावसावर अवलंबून आहे. पाऊस किती पडणार, त्याचे प्रमाण समसमान राहणार का, यावरच शेतीचे भवितव्य ठरते. इतकेच नव्हे, तर देशाचा आर्थिक विकास दर ठरविण्यातही हा पाऊस महत्त्वाची भूमिका बजावतो. हा आनंदघन निश्चितपणे आनंददायी असला, तरी अतिवृष्टी वा ढगफुटी आपल्यापुढे नवनवीन आव्हाने उभी करत आहे. मागच्या काही वर्षांत आपण या चक्रातून जात आहोत. जागतिक तापमान वाढ ही आज समस्त जगापुढची सर्वांत मोठी समस्या बनली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे ढगफुटीसारख्या घटना वाढताना दिसतात. उत्तराखंडमधील जलप्रलय, चिपळूणची अतिवृष्टी हे त्याचेच निदर्शक. आगामी काळात अशा घटना गृहीत धरूनच आपल्याला पुढे जावे लागेल. त्याला सामोरे जाण्याकरिता आवश्यक यंत्रणा उभाराव्या लागतील. अर्थातच या सर्वांचे मूळ हे पर्यावरणाचा ऱहास हे असल्याने त्या आघाडीवर सूक्ष्मपणे काम करण्याची गरज आहे. झाडाझुडपांसह, नदी, नाले, डोंगर यांचा आदर राखत विकासाची पायवाट तयार केली, तरंच आपण बुडण्यापासून वाचू शकतो.