भाजपमधील गटबाजी रोखण्यासाठी संघाचा हस्तक्षेप
आज बेंगळूरमध्ये बैठक : 40 नेत्यांना सहभागी होण्याचे निमंत्रण : राजकीय वर्तुळात तीव्र कुतूहल
बेंगळूर : राज्य भाजपमधील गटबाजी नियंत्रणात आणण्यासाठी आणि पक्षातील काही जणांकडून स्वपक्षातील नेत्यांवर होणारी टीका-टिप्पणी रोखण्यासाठी आता रा. स्व. संघाने हस्तक्षेप केला आहे. याकरिता गुरुवारी बेंगळूरमध्ये राज्य भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी 40 जणांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्य भाजपमधील मतभेद मिटविण्यासाठी बोलावण्यात आलेली ही बैठक चेन्नेहळ्ळी येथील रा. स्व. संघाच्या कार्यालयात होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, राज्य भाजप प्रभारी राधामोहन दास, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधानपरिषदेचे विरोधी नेते चलवादी नारायणास्वामी, भाजप विधिमंडळ उपनेते अरविंद बेल्लद, खासदार जगदीश शेट्टर, गोविंद कारजोळ, राज्य भाजपचे सचिव आणि आमदार व्ही. सुनीलकुमार, एन. रवीकुमार, माजी आमदार पी. राजीव, आमदार महेश टेंगीनकाई तसेच बसनगौडा पाटील-यत्नाळ, रमेश जारकीहोळी, माजी खासदार जी. एम. सिद्धेश्वर, आमदार बी. पी. हरिश, माजी मंत्री अरविंद लिंबावळी यांच्यासह एकूण 40 जण बैठकीत सहभागी होणार आहेत.
असंतुष्ट गटातील नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह काही नेत्यांच्या तडजोडीच्या राजकारणामुळे पक्षाच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे, असे सांगून वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कुडलसंगमपासून बळ्ळारीपर्यंत पदयात्रा काढणार असल्याचे सांगितले होते. यामुळे राज्य भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. त्यानंतर विजयेंद्र यांनी काही नेत्यांसह दिल्ली गाठून असंतुष्ट नेत्यांविरुद्ध पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. त्यानंतर वरिष्ठांनी असंतुष्ट गटातील नेत्यांनी पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशी उघडपणे वक्तव्ये करू नयेत, अशी ताकीद दिली होती.
नेत्यांची मते जाणून घेणार...
पक्षातील नाराजी कमी झाल्याचे दिसत असले तरी अंतर्गत असमाधानाची धग कायम असल्याचे वरिष्ठांच्या लक्षात आले. त्यामुळे राज्य भाजपमधील मतभिन्नता दूर करण्यासाठी रा. स्व. संघ नेत्यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे गुरुवारी बेंगळुरात होणाऱ्या बैठकीत नेत्यांची मते जाणून घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.