आरएसएसचे उपक्रम सरकारी जागेत नको
आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कार्यक्रमांसाठी सरकारी जागांचा वापर करू नये. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आरएसएसमध्ये राहून काम करू नये. आरएसएसच्या उपक्रमांवर राज्य सरकारकडून बंदी आणण्याचा विचार केला जात असेल तर यात गैर काय? असा उलट प्रश्न आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी व्यक्त केला. एका खासगी कार्यक्रमासाठी मंगळवारी आरोग्यमंत्री बेळगावमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना भाजप या राजकीय पक्षाचाच एक भाग आहे. यावर्षी आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त अनेक ठिकाणी उपक्रम राबविले जात आहेत. परंतु सरकारी शाळा व सरकारी जागेमध्ये हे उपक्रम राबविले जाऊ नये, अशी भूमिका ग्रामविकास मंत्री प्रियांक खर्गे यांनी मांडली होती. ही भूमिका योग्य असल्याचे समर्थन आरोग्यमंत्र्यांनी केले. आरएसएस ही सांस्कृतिक अथवा शैक्षणिक संस्था नसून ती एक राजकीय संघटना आहे. राजकारणात प्रत्यक्षरित्या नसली तरी अप्रत्यक्षरित्या त्या संघटनेचा सहभाग राजकारण तसेच कारभारामध्ये असतो. त्यामुळे सरकारी जागांवर या संघटनेचा उपक्रम नकोत, अशी भूमिका राज्य सरकारचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.