आरएसएफ-एसएएफ युद्धविरामावर सहमत
सूदानमध्ये 2 वर्षांपासून संघर्ष : अमेरिका, युएईच्या मध्यस्थीला येणार यश
वृत्तसंस्था/ खारतूम
सूदानमध्ये दोन वर्षांपासुन सुरू असलेल्या हिंसक संघर्षादरम्यान आता शांततेचा किरण दिसून येत आहे. देशाचे निमलष्करी दल रॅपिड सपोर्ट फोर्सने (आरएसएफ) अमेरिकेच्या प्रस्तावावर सूदानच्या सैन्यासाब्sात (एसएएफ) युद्धविरामासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. अमेरिका, सौदी अरेबिया, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिरातच्या नेतृत्वाखालील ‘क्वाड’ समुहाकडून सुचविण्यात आलेल्या मानवीय युद्ध्वरामाला स्वीकारण्यास तयार असल्याचे आरएसएफने म्हटले आहे. या युद्धविरामाचा उद्देश युद्धामुळे बिघडणारी मानवीय स्थिती सुधारणे आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आहे. परंतु या घोषणेवर सूडानच्या सैन्याकडुन अद्याप कुठलीच अधिकृत टिप्पणी करण्यात आलेली नाही.
कराराच्या मुद्द्यांवर चर्चा
अमेरिकेचे अरब आणि आफ्रिका विषयक वरिष्ठ सल्लागार मसाद बुलोस यांनी आरएसएफ आणि एसएएफ दरम्यान कराराचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत दोन्ही दलांनी तात्विक स्वरुपात युद्धविरामाला मान्यता दिली असल्याचा दावा केला आहे. कुठल्याही सुरक्षा दलाने प्रारंभी आक्षेप नोंदविलेला नाही. आता आम्ही कराराच्या मुद्द्यांवर काम करत आहोत असे त्यांनी सांगितले आहे.
सैन्यप्रमुखांचे वक्तव्य
आमचे सैन्य शत्रूच्या पराभवासाठी संघर्ष करत आहे. ज्या लोकांना मारून टाकण्यात आले किंवा ज्यांच्यावर अत्याचार झाला, अशा लोकांच्या वतीने आम्ही सूड घेणार आहोत असे सैन्यप्रमुख अब्देल फतह अल-बुरहान यांनी म्हटले आहे.
नरसंहाराचा आरोप
उत्तर दारफुर प्रांताची राजधानी अल-फाशरवर कब्जा करताना नरसंहार केल्याचा आरोप आरएसएफवर झाला आहे. 26 ऑक्टोबर रोजी शहरावर नियंत्रण मिळविण्यापूवीं आरएसएफने सुमारे 18 महिन्यांपर्यंत वेढा घातला होता. आरएसएफने कब्जा केल्यावर अल-फाशर आणि आसपासच्या भागांमधून 70 हजारांहून अधिक लोकांनी पलायन केले आहे. शहरात सामूहिक हत्या, बलातकार आणि अत्याचार झाले आहेत. आरएसएफच्या कब्जादरम्यान रुग्णालयातच 460 हून अधिक रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
युद्धगुन्ह्यांचा आरोप
संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेने स्वत:च्या अहवालात आरएसएफ आणि एसएएफ दोघांनाही युद्धगुन्ह्यांसाठी जबाबदार ठरविले आहे. दोन्ही सुरक्षा दलांनी नागरिकांवर हल्ले, हत्या आणि लैंगिक हिंसा यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत असे अहवालात म्हटले आहे. सद्यकाळात आरएसएफचे सूडानच्या पश्चिम दारफुर आणि दक्षिण हिस्स्यांवर नियंत्रण आहे. तर सैन्य उत्तर, पूर्व आणि नाइल नदी तसेच लाल सागराच्या आसपासच्या भागांमध्ये मजबूत आहे.