शिरुर दुर्घटनेतील बेपत्ता दोन व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत
कारवार : अंकोला तालुक्यातील शिरुर येथील दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या त्या दोन व्यक्तींच्या कुटुंबीयांना सोमवारी जिल्हा पालकमंत्री आणि मासेमारी व बंदर विकास मंत्री मंकाळी वैद्य यांच्या हस्ते प्रत्येकी 5 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. अतिमुसळधार पावसामुळे 16 जुलै रोजी अंकोला तालुक्यातील शिरुर येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर दरड कोसळून 11 जण बेपत्ता झाले होते. यापैकी 9 जाणांचे मृतदेह सापडले. तथापी जगन्नाथ नाईक आणि लोकेश नाईक यांचे मृतदेह अथक प्रयत्नानंतरही हाती लागले नव्हते. जगन्नाथ नाईक आणि लोकेश नाईक यांच्या कुटुंबीयांना सरकारने मदत द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. शेवटी सोमवारी सरकारकडून मदत देण्यात आली. बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबीयांना धनादेश देताना कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया, जिल्हा पोलिस प्रमुख एम. नारायण, कारवार जिल्हा पंचायत मुख्य कार्यदर्शी ईश्वरकुमार कांदू आणि बेपत्ता झालेल्या व्यक्तींचे कुटुंबीय उपस्थित होते.