रॉय-घोरपडे महिला दुहेरीत अजिंक्य
वृत्तसंस्था/रोम (इटली)
येथे झालेल्या 2024 च्या विश्वटेबल टेनिस फेडरेशनच्या फिडेर कॅगलेरी टेबल टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या महिला टेबलटेनिसपटू कृत्विका रॉय आणि यशस्वीनी घोरपडे यांनी महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात रॉय आणि घोरपडे या जोडीने द. कोरीयाच्या सीवू आणि किम हेयुन यांचा 11-9, 9-11, 14-12, 11-2 अशा 3-1 गेम्समध्ये पराभव केला. भारताच्या या द्वितीय मानांकित जोडीने या स्पर्धेत पहिल्या फेरीत इटलीच्या बॅरेनी आणि पिकु यांचा 3-0 अशा गेम्समध्ये फडशा पाडला होता. तर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत त्यांनी जपानच्या अवोकी आणि योकोई यांचा 3-0 असा पराभव करत उपांत्यफेरीत स्थान मिळविले होते. उपांत्यफेरीत रॉय आणि घोरडपे यांनी जर्मनीच्या सोफीया क्लि आणि स्क्रेरनेर यांचा 3-1 असा फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत भारताच्या यशस्वीनी घोरपडेने हरमित देसाई समवेत मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण इटलीच्या ओयबोडे आणि मोनाफर्देनी यांनी यशस्वीनी व हरमित देसाई यांचा 3-0 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. घोरपडेने महिला एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.