सडलेल्या रेल्वेडब्याचे हॉटेलमध्ये रुपांतर
एक दिवस वास्तव्याचे भाडे 44 हजार रुपये
एका जुन्या आणि जर्जर झालेल्या रेल्वेडब्याचा वापर कसा केला जाऊ शकतो? हा डबा भंगारात विकून पैसे कमवावेत असा विचार बहुतांश लोक करतील. परंतु सोशल मीडियावर सध्या एका अशा लक्झरी हॉटेलची चर्चा होतेय, जे रेल्वेच्या एका जर्जर डब्याला बदलून तयार करण्यात आले आहे. रेल्वेच्या डब्याला इतक्या सुंदरपणे सजविण्यात आले आहे की ते एखाद्या क्लासिक हॉलिवूड चित्रपटाचा सेटच वाटत आहे.
इसाक फ्रेंच यांनी स्वत:ची अनोखी कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. इसाक यांनी स्वत:च्या वडिलांसोबत मिळून 120 वर्षे जुन्या रेल्वेडब्याला पूर्णपणे नवे रुप दिले आहे. काही काळापूर्वी त्यांनी या रेल्वेडब्याला केवळ 2 हजार डॉलर्समध्ये खरेदी केले होते. या डब्याची स्थिती अत्यंत खराब होती, त्याच्या कंपार्टमेंट्समध्ये सुमारे 20 मांजरांनी स्वत:चे वास्तव्य सुरू केले होते. तर आतमध्ये सर्वत्र गंज लागलेले अवशेष आणि दुर्गंध फैलावलेला होता.
इसाक आणि त्याच्या परिवाराने 5 महिन्यांची कठोर मेहनत आणि 1 लाख 47 हजार डॉलर्सच्या गुंतवणुकीनंतर या जुन्या रेल्वेडब्याला त्यांनी पूर्णपणे बदलून टाकले आहे. त्यांनी मेल कंपार्टमेंटला बेडरुम, कार्गो एरियाला बाथरुम आणि पॅसेंजर स्पेसला किचन आणि लाउंजमध्ये बदलले आहे. आता हा रेल्वेडबा अमेरिकतील सर्वात एक्सक्लूसिव्ह आणि प्रॉफिटेबल स्टेपैकी एक ठरला आहे.
इतिहास अन् आधुनिकतेचे मिश्रण
अनोख्या ट्रेन स्टे ग्राहकांना जुन्या काळातील रेल्वेचा रोमांचक अनुभव प्रदान करतो. येथील इंटीरियल एक रॉयल फीलिंग देतो. प्रत्येक कोपरा इतिहास आणि आधुनिकतेचे परिपूर्ण मिश्रण दर्शविणारा आहे. याचमुळे लोकांसाठी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन ठरले आहे, जे खास आणि आकर्षक अनुभव प्रदान करते असे इसाक प्रेंच यांनी सांगितले आहे.
किती येणार खर्च
इसाक यांनी स्वत:च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक लिंकही अपलोड केली आहे. ज्यानुसार भारतीय रुपयात येथे एक दिवस वास्तव्य करण्यासाठी सुमारे 44 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. येथील आकर्षक बेडरुम, लक्झरी बाथरुम आणि प्रायव्हेट डायनिंग एरिया प्रत्येक ग्राहकाला एक खास अनुभव प्रदान करतो. याचमुळे ही ट्रेन कार आता सोशल मीडिया सेंसेशन ठरली आहे.