रोटरीतर्फे पोलिओ निर्मूलन दिनानिमित्त जागृती रॅली
बेळगाव : जागतिक पोलिओ निर्मूलन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे शुक्रवारी पोलिओ निर्मूलन जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कित्तूर राणी चन्नम्मा चौकापासून धर्मवीर संभाजी चौक व तेथून पुन्हा राणी चन्नम्मा चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये रोटरीचे प्रांतपाल तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी प्रांतपाल अविनाश पोतदार म्हणाले, मागील 40 वर्षांत जगभरातील पोलिओ निर्मूलनासाठी रोटरीने महत्त्वाची सेवा बजावली आहे. भारतातही पोलिओ निर्मूलनात रोटरीचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रत्येक बालकापर्यंत रोटरीने पोहोचून त्यांना पोलिओचे डोस दिले आहेत. सध्या पाकिस्तान व अफगाणिस्तान या दोन देशात वगळता पोलिओचे पूर्णत: निर्मूलन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
राणी चन्नम्मा चौकात रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. रोटरीचे माजी प्रांतपाल बबन देशपांडे, अविनाश पोतदार व नियोजित प्रांतपाल अशोक नाईक यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले. 24 ऑक्टोबर हा दिवस जागतिक पोलिओ निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जात असल्याने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेळगाव शहरातील विविध रोटरी क्लबचे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी गोविंद मिसाळे, उदयसिंग रजपूत, संदीप नाईक, विजयालक्ष्मी मण्णीकेरी, आकाश पाटील, शशिकांत नाईक, कविता कग्गणगी, कावेरी केरुर, नंदन बागी यासह मोठ्या संख्येने रोटरीचे पदाधिकारी सहभागी होते.