रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे 16 रोजी ‘हाफ मॅरेथॉन-2025’
अध्यक्ष शशिकांत नाईक यांची पत्रकार परिषदेत माहिती : सहभागी होण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्यावतीने ‘जिथे प्रत्येक पाऊल कथा सांगतं’ या संकल्पनेखाली विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मिलेनियम गार्डन येथे 13 व 14 नोव्हेंबर रोजी डॉ. साठे यांच्या आरोग्य मित्र फौंडेशनच्या सहकार्याने हेल्थ अॅण्ड फिटनेस एक्स्पो व मुलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवार दि. 16 रोजी सकाळी 6 वा. हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन रोटरीचे अध्यक्ष शशिकांत नाईक यांनी केले आहे.
आदर्श हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हेते. नाईक म्हणाले, रोटरीचे हे मॅरेथॉनचे 15 वे वर्ष आहे. रविवारी सकाळी 6 वाजता लिंगराज कॉलेजच्या मैदानावरून मॅरेथॉनला सुरुवात होऊन अंगडी कॉलेजपर्यंत मार्गक्रमण करून लिंगराज कॉलेजच्या मैदानावर मॅरेथॉनची सांगता होणार आहे. ही मॅरेथॉन 12 कि. मी., 10 कि. मी., 5. कि. मी., 3 कि. मी. विभागात होणार आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी शुल्क आकारण्यात येणार असून 21 कि. मी. साठी 1500 रु., 10 कि. मी. साठी 1000 रु., 5 कि. मी. साठी 800 रु. तर विद्यार्थ्यांकडून 200 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. वायव्य लॅब्स, टी अॅण्ड टोस्ट कंपनी यंदाच्या मॅरेथॉनचे मुख्य प्रायोजक असणार आहेत. मॅरेथॉनसाठी नाव नोंदणी करण्याची 10 नोव्हेंबर ही अंतिम तारीख असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रोटरीचे सचिव लोकेश होंगल, उमेश रामगुरवाडी, निलेश बंग, वर्षा साठे, सचिन कुलगोड, डी. बी. पाटील यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.