रॉस्टन चेस विंडीजचा कसोटी कर्णधार
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा : 4 वर्षानंतर शाय होपचे पुनरागमन : संघात अनेक नवे चेहरे
वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजकडून संघाची घोषणा करण्यात आली आहे. उभय संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार असून यासाठी वेस्ट इंडिजने बुधवारी 16 सदस्यीय संघ जाहीर केला. ज्यामध्ये स्टार फलंदाज शाय होपचा समावेश करण्यात आला आहे. चार वर्षांनंतर होप पुनरागमन करणार आहे. संघाच्या कर्णधारपदाची धुरा रॉस्टन चेसकडे सोपवण्यात आली आहे. उभय संघातील पहिला सामना दि. 25 जूनपासून ब्रिजटाऊन येथे सुरु होईल.
केव्हलॉन अँडरसनला पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे. देशांतर्गत हंगामात चांगली कामगिरी केल्यानंतर गयानाचा फलंदाज केवलन अँडरसनला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात येऊ शकते, असे वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी म्हणाले. याच वेळी, शाय होपच्या पुनरागमनावर त्यांनी सांगितले की तो मर्यादित षटकांच्या स्वरूपात सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. होपने 38 कसोटी सामन्यांमध्ये दोन शतके आणि पाच अर्धशतके झळकावून 1,726 धावा फटकवल्या आहेत. 284 कसोटी विकेट्स घेतलेल्या अनुभवी वेगवान गोलंदाज केमार रोचला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघात शमार जोसेफचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये वेस्ट इंडिजच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका वठवली होती. याचवेळी, विंडीज संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, ही मालिका 2025-27 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलचा भाग असणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी विंडीज संघ - रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन, केव्हलॉन अँडरसन, क्रेग ब्रेथवेट, जॉन कॅम्पबेल, कीस कार्टी, जस्टिन ग्रीव्हज, शाय होप, टेविन इमलाच, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, जोहान लेन, मिकाईल लुईस, अँडरसन फिलिप, जेडेन सील्स.