For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयुष्याची दोरी

06:12 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयुष्याची दोरी
Advertisement

‘कृष्णाच्या खोड्या अती, गुंगुनी जाई मती, धाकात ठेव त्या जरा, ग यशोदे असेल तुझा तो कान्हा’ असे म्हणत सतत कृष्णाची तक्रार करणाऱ्या गोपिकांना यशोदेने कृष्णाला केलेली शिक्षा अजिबातच आवडत नाही. कारण लोण्याहून मऊ असलेले गोपीहृदय. एक दिवस स्वत:च्याच घरात चोरी करताना यशोदेने कन्हैयाला पकडले आणि चोरीची सवय तुटावी म्हणून त्याला दोरीने बांधून टाकावे असे ठरवले तेव्हा गोपी धावतच यशोदेकडे येऊन म्हणाल्या, ‘आमच्या घरी दह्यादुधाची लूट करतो म्हणून जरी आम्ही कृष्णाची तक्रार करीत असलो तरी त्याला दोरीने बांधायचा विचार काही आमच्या डोक्यात आला नाही. तू असे करू नको. सोड बघू त्याला.’ परंतु यशोदेचा ताबा घेतलेला क्रोध तिला तसे करू देईना. तेव्हा आश्चर्य असे घडले की दोरीला दोरी बांधून माप घेतले तरी कृष्णाला बांधायला दोन बोटे दोऱ्या कमी पडू लागल्या. एकीला दुसरी, दुसरीला तिसरी अशा अनेक दोऱ्या जोडूनही त्या पुरेनात. असे का झाले? कारण दोरीचा स्वभावच बदलून गेला. बांधणे हा तिचा स्वभाव तिने सोडून दिला.

Advertisement

श्रीमद् भागवतात म्हटले आहे की ‘यशोदेचे दोरीने श्रीकृष्णाला बांधणे हे लक्ष्मीला म्हणजे ऐश्वर्य शक्तीला रुचले नाही. लक्ष्मीने दोरीत प्रवेश केला. कृष्ण तिचा स्वामी आहे. तो बंधनात राहिलेला तिला आवडत नाही.’ कृष्ण खरंतर सर्वांना प्रपंचातून मुक्त करणारा आहे. तो कसा बांधला जाईल? पू. डोंगरे महाराज म्हणतात, ‘ऐश्वर्य आणि यशोदेच्या वात्सल्यशक्तीचे हे गोड भांडण आहे. कृष्ण लक्ष्मीला म्हणाला, गोकुळात मी तुझा नवरा नाही, तर यशोदेचा मुलगा आहे. तिला मला बांधायचे आहे तर बांधू दे. गोकुळात प्रेम प्रथम आहे. तेव्हा लक्ष्मीने दोरीचा निरोप घेतला आणि कृष्ण बांधला गेला. कृष्ण म्हणतो, मी लौकिक दोरीने नाही तर प्रेमाच्या दोरीनेच बांधला जातो. जेव्हा मी कृपा करतो तेव्हाच स्वत:ला बांधून घेतो.

एकदा एका गोपीने कृष्णाला खांबाला दोरीने बांधून टाकले आणि ती साऱ्या गावाला ही वार्ता सांगायला गेली तेव्हा कृष्ण हळूच निसटून गेला. भक्तीची जाहिरात केली तर भगवंत सुटून जातो. माणूस जेव्हा देवाला बांधायला जातो तेव्हा तो हाती लागणे कठीण आहे, पण जर देवाने माणसाला बांधले तर दोरीची गाठ सुटणे अशक्य. तो बंधन सैल करत नाही, तर बांधूनच मुक्ती देतो. ‘राधा गवळण करिते मंथन, अविरत हरिचे मनात चिंतन’ या लोकप्रिय भक्तिगीताचे शेवटचे कडवे सुंदर आहे... ‘राधेविण ते मंथन चाले, नवल बघाया नवनीत आले.’ कृष्णात राधा एकरूप झाली आणि तिचे देवकीनंदन रूप बघायला लोणी वर आले. ताक घुसळून लोणी काढायला दोरीचे सहाय्य लागते. दोरीशिवाय लोणी संभवतच नाही. मनातही कृष्णाच्या नामस्मरणाची घुसळणारी दोरी हवी. तरच कृष्ण कृष्ण म्हणत मनाचे मंथन होईल. त्याच्या नामाचे लोणी जीवन मुक्त करील यात शंकाच नाही.

Advertisement

अमृतप्राप्तीसाठी देव-दानवांनी समुद्रमंथन केले. मंदर पर्वत उचलून समुद्रात आणला. तो घुसळण्यासाठी वासुकी नावाचा नाग दोरीरूप झाला. ही दोरी मंदर पर्वताला गुंडाळून मंथन सुरू झाले. त्या पर्वतावर असलेले पशुपक्षी समुद्रात पडले आणि खवळून गेले. त्यांच्यापासून निर्माण झालेले विष समुद्रातून वर आले. ते हलाहल होय. ते शिवशंकराने प्राशन केले. समर्थ रामदास स्वामी शंकराच्या आरतीत म्हणतात- ‘देवीदैत्यी सागर मंथन पै केले, त्यामाजी अवचित हलाहल जे उठले, ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले.’  शिव आणि विष्णूमहात्म्य समुद्रमंथन कथेत आहे. सर्प आणि दोरी यांचे अध्यात्मप्रांतात ठळक आणि महत्त्वाचे स्थान आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली म्हणतात-

‘तरी आता देह असो अथवा जावो ।

आम्ही तो केवळ वस्तूचि आहो ।

का जे दोरी सर्पत्व वावो ।

दोराचि कडूनी ?’

-संसार आम्ही समजतो तसा नसून मिथ्या आहे. देह असो किंवा जावो, आम्ही ब्रह्मच आहोत. दोरीला सर्प समजणे म्हणजे मनामध्ये जे आहे ते त्या दोरीवर आरोपित करणे होय. मी जे जग पाहतो ते खरे नसून तो अध्यारोप आहे. संत सोहिरोबानाथ यांचा एक अभंग आहे- ‘हरिभजनावीण काळ घालवू नको रे..’  त्यात ते म्हणतात, ‘दोरीच्या सापा भिवुनी भवा । भेटी नाही जीवा-शिवा ।  अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे?’ मृगजळासमान असणाऱ्या संसाराला सत्य मानल्यामुळे जिवाची अंतरातल्या शिवाशी भेट घडत नाही. अंतरातला ज्ञानदिवा उजळण्यापूर्वीच विझून जातो.

संत तुलसीदासांचे चरित्र दिव्य आहे. तुलसीदास मोठे विद्वान होते. त्यांचा विवाह रत्नावली नावाच्या तेजस्वी विदुषी स्त्राrशी झाला होता. मुसळधार पावसात ते एकदा पत्नीला भेटायला तिच्या माहेरी गेले तेव्हा ती तुलसीदासांच्या विचारात रात्री गच्चीत जागत बसली होती. तिला भेटायला ते एका सापाला दोर समजून चढून वर गच्चीत गेले. आपला पती दोर आणि सर्प यांच्यातला फरक लक्षात न घेता आपल्या ओढीने वर चढून आला हे कळताच रत्नावलीने त्यांच्याशी अध्यात्मसंवाद साधला आणि बुद्धिचातुर्याने त्यांचे मन वळवून त्यांची विचारधारा तिने बदलून टाकली. त्यानंतर तुलसीदासांनी गृहत्याग केला व संन्यास घेतला. त्यांचे जीवन तपस्वी, तेजस्वी झाले. जीवाशिवाची भेट एका सर्पाला दोरी समजल्यामुळे झाली. पुढे असंख्य लोकांना सन्मार्गाला लावण्याचे कार्य संत तुलसीदासांनी केले.

जन्माला आल्यानंतर पाळण्याच्या दोरीशी सलगी होऊन माणसाचा देह आणि मन संस्कारित होते आणि जगण्याचा शेवट आयुष्याचा दोर तुटल्यानेच होतो. संत तुकडोजी महाराज यांचे एक पद आहे-

येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली

या आयुष्याची दोरी कमी जाहली..

बस सेवा दे आखरी, तव नाम जपे वैखरी’

-सद्गुरूंचे नाम घेत आयुष्य नावाच्या नावेची दोरी तुटली तर ती नाव परमार्थाच्या किनाऱ्याला लागेल यात शंकाच नाही.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.