रोमानिया, स्लोव्हाकिया संघांचा बरोबरीनंतर बाद फेरीत प्रवेश
वृत्तसंस्था/ फ्रँकफर्ट
रोमानिया आणि स्लोव्हाकिया यांनी फ्रँकफर्ट येथे झालेल्या सामन्यातील 1-1 अशा बरोबरीनंतर युरो, 2024 मधील 16 संघांच्या बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. दोन्ही संघांनी ‘ई’ गटातून प्रगती केली आहे. ओंद्रेज दुडाने 24 व्या मिनिटाला बचावातील चुकीचा फायदा घेत जुराज कुकाच्या क्रॉस पासवर हेडरद्वारे गोल केल्याने स्लोव्हाकियाला आघाडी मिळाली. मात्र रोमानियाने 43 व्या मिनिटाला पेनल्टी मिळवली. यावेळी इयानिस हागीच्या बाबतीत डेव्हिड हॅन्कोने फाऊल केले. या पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर करून रोमानियाने बरोबरी साधली.
या निकालामुळे ई गटातील चारही संघांचे चार गुण झाले. मात्र उत्कृष्ट गोल फरकाच्या जोरावर रोमानियाने अव्वल स्थान पटकावले, तर स्लोव्हाकियाने त्याच निकषावर तिसऱ्या स्थानासाठीच्या शर्यतीत युक्रेनला मागे टाकले. बेल्जियमने सामना बरोबरीत राहूनही बाद फेरीत प्रवेश केला आहे. 2000 नंतर युरोपियन चॅम्पियनशिपच्या बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची ही रोमानियाची पहिली खेप आहे. स्लोव्हाकियाने याआधी 2016 मध्ये हा पराक्रम गाजविला होता. आता दुसऱ्यांदा ते 16 संघांच्या फेरीत पोहोचले आहेत.