पाळणाघरांचा रोहयो कामगारांनी सदुपयोग करुन घ्यावा
जि.पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर : सरकारचा अभिनव उपक्रम
बेळगाव : रोजगार हमी योजनेंतील महिला कामगारांची संख्या वाढविण्यासाठी पाळणा घर उपयोगी ठरणार आहे. महिला कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती जि.पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी दिली. येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्न्मेंट येथे गुरुवारी जि.पं. आणि एसआयआरडी यांच्या संयुक्त विद्यमाने पाळणा घर केअर टेकर प्रशिक्षणाचे उद्घाटन करून ते बोलत होते. रोहयोमध्ये जिल्ह्यात महिला कामगारांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या लहान मुलांच्या पालनपोषणासाठी पाळणाघर उपयोगी ठरणार आहे. याचा रोजगार हमी योजनेतील कामगारांनी लाभ घ्यावा, असे हर्षल भोयर यांनी आवाहन केले. जि.पं. संयोजक बसवराज एन. यांनी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, साहाय्यक संचालक सविता एम., जिल्हा आयईसी संयोजक प्रमोद गोडेकर, तांत्रिक संयोजक नागराज यरगुद्दी, रमेश मादर यांच्यासह जि.पं. अधिकारी उपस्थित होते. एएनएसआयआरडी म्हैसूरचे अधिकारी डी.टी.सी. संजीव तळवार यांनी आभार मानले.