रोहयो कामगारांनी ई-केवायसी करावे
जि.पं. सीईओंचे आवाहन : 8780 कामगारांची ई-केवायसी अपडेट
प्रतिनिधी/ बेळगाव
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अर्थात रोहयो अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व सक्रिय कामगारांनी ई-केवायसी एनएमएमएस अॅपद्वारे अपडेट करावी, असे आवाहन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले आहे.
सीईओ राहुल शिंदे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यामध्ये म्हटले आहे की, रोहयोअंतर्गत कुली कामगारांच्या हजेरीत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसीद्वारे (जॉबकार्डला आधार लिंक) कामगारांची माहिती अपडेट करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 500 ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रात 6,03,627 सक्रिय कुली कामगारांची ई-केवायसी करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारे जॉबकार्ड व आधारकार्ड कुली कामगारांनी ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावेत. जिल्ह्यात आतापर्यंत 8780 कुली कामगारांनी ई-केवायसीद्वारे आपली माहिती अपडेट केली आहे. नोंदणीकृत सर्व कुली कामगारांनी 31 ऑक्टोबरपूर्वी ई-केवायसी करावी, अधिक माहितीसाठी आपल्या ग्राम पंचायतीशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.