आशियाई जलतरण स्पर्धेत रोहितला रौप्य, श्रीहरीला कांस्य
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
येथे सुरु झालेल्या अकराव्या आशियाई जलतरण चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा स्टार जलतरणपटू श्रीहरी नटराजने पुन्हा एकदा उंच झेप घेतली आहे. त्याने 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये कांस्यपदक जिंकून आपले वैयक्तिक पाचवे पदक मिळविले. रोहित बी बेनेडिक्टननेही पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदक जिंकून भारताची एकूण पदकांची संख्या नऊवर नेली.
50 मीटर अंतरावेळी श्रीहरी तिसऱ्या स्थानावर होता. चीनचा हाओयू वांग (49.19) आणि कतारचा अली तमेर हसन (49.46) त्याच्याहून पुढे होते, तर आकाश मणी (50.45) चौथ्या क्रमांकावर होता. दुसऱ्या लॅपमध्ये, श्रीहरीने आपले वर्चस्व कायम ठेवत इतरांना मागे टाकत 49.96 सेकंद वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले.
पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लायमध्ये, रोहितने चांगली सुरुवात केली आणि 23.89 वेळेसह रौप्यपदक जिंकल. कझाकस्तानच्या आदिलबेक मुसिनने 23.74 वेळेसह प्रथम क्रमांक मिळविले. दरम्यान, धिनीधी देसिंगू आणि शशिधरा रुजुला यांनी महिलांच्या 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवले परंतु त्यांना अनुक्रमे सहाव्या आणि आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.