रोहित, विराटचे कमबॅक, नेतृत्वाची धुरा शुभमनकडे
वनडेतही ‘शुभमन’ पर्व : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा : बुमराह, हार्दिकला विश्रांती
वृत्तसंस्था/ मुंबई
बीसीसीआयने शनिवारी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सज्ज झाली आहे. पण कसोटीनंतर आता वनडेतही नव्या पर्वाची सुरुवात झाली असून कसोटी पाठोपाठ वनडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही आता शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. श्रेयसचेही प्रमोशन झाले असून त्याला उपकर्णधार करण्यात आले आहे.
भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आता ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित झाला आहे. हा दौरा 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान पार पडणार असून यात उभय संघात 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळले जातील. बीसीसीआयने या मालिकेसाठी शनिवारी टीम इंडियाची घोषणा केली आहे. आता शुभमन गिल कसोटीसोबतच वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. म्हणजेच रोहित आणि विराट फलंदाज म्हणून संघात सामील असतील. या दोघांनी शेवटचा सामना भारतासाठी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. जवळपास 7 महिन्यानंतर हे दोघे पुन्हा मैदानात दिसणार आहेत.
जसप्रीत बुमराह, हार्दिक, जडेजाला विश्रांती
जसप्रीत बुमराहला वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तो सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. तसेच, ऋषभ पंतही या मालिकेतून बाहेर आहे. इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाल्यामुळे त्याला संघात स्थान मिळालेले नाही. याशिवाय, हार्दिक पंड्याही दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होणार नाही. दुसरीकडे, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा तसेच फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पटेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल संघाचा भाग असतील. याशिवाय, वॉशिंग्टन सुंदर आणि केएल राहुलचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -
शुभमन गिल, (कर्णधार) श्रेयस अय्यर (उपकर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रे•ाr, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
टी- 20 मालिकेसाठी भारतीय संघ -
सूर्यकुमार यादव (कर्णधार) अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रे•ाr, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
उभय संघातील मालिकेचे वेळापत्रक
पहिला वनडे सामना - 19 ऑक्टोबर, पर्थ
दुसरा वनडे सामना - 23 ऑक्टोबर, अॅडलेड
तिसरा वनडे सामना - 25 ऑक्टोबर, सिडनी
टी - 20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना - 29 ऑक्टोबर, कॅनबेरा
दुसरा सामना - 31 ऑक्टोबर, मेलबर्न
तिसरा सामना - 2 नोव्हेंबर, होबार्ट
चौथा सामना - 6 नोव्हेंबर, गोल्डकोस्ट
पाचवा सामना - 8 नोव्हेंबर, ब्रिस्बेन
गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना रोहित, विराटसमोर चॅलेंज
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनीही टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धा ही 2027 मध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन वनडे सामन्यासह भारतीय संघ या काळात फारच कमी वनडे खेळणार आहे. त्यामुळे टी-20 आणि कसोटीतून निवृत्ती घेत मध्यम मार्ग स्वीकारलेल्या जोडीसमोर या स्पर्धेपर्यंत संघात टिकून राहण्याचे एक मोठे चॅलेंज असेल.
शुभमनला कॅप्टनशिप देण्याचा निर्णय योग्यच - अजित आगरकर
रोहितच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करत असतानाही त्यांनी एका चॅम्पियन कर्णधाराला का काढून टाकले असे विचारले असता, टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, तीन फॉरमॅटसाठी तीन कर्णधार असणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे आणि सध्या एकदिवसीय हा सर्वात कमी खेळला जाणारा फॉरमॅट आहे. आमचा सध्या तरी पूर्ण फोकस टी-20 विश्वचषकावर आहे. गिलला जुळवून घेण्यासाठी, वेळ देण्याची योजना आहे. टीम इंडिया सध्या खूप कमी वनडे क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे 2027 च्या तयारीसाठी गिलला योग्य वेळी कर्णधारपद देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दरम्यान, रोहितने या मालिकेपूर्वी आपले 10 किलो वजन कमी केल्याचे दिसले. रोहित आणि विराट कोहली हे दोघेही वनडे विश्वचषक खेळणार असल्याचे म्हटले जात आहे. कसोटीतून यापूर्वीच निवृत्ती घोषित केली असल्याने वनडे फॉरमेटमध्ये आता हे दोघे किती काळ खेळतील याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. याशिवाय, या दोघांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कामगिरी कशी होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.