विश्वचषकातील भारतीय कनिष्ठ हॉकी संघाचे नेतृत्व रोहितकडे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाने शुक्रवारी 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान तामिळनाडू येथे होणाऱ्या एफआयएच विश्वचषकासाठी 18 सदस्यीय भारतीय कनिष्ठ पुऊष हॉकी संघाची घोषणा केली आहे. प्रसिद्ध पी. आर. श्रीजेशकडून प्रशिक्षित भारतीय संघाचा गट ‘ब’मध्ये समावेश असून त्यात पाकिस्तानच्या जागी आलेला ओमान, चिली, स्वित्झर्लंड हे संघ आहे.
प्रशिक्षक श्रीजेश यांनी म्हटले आहे की, आम्ही चाचणी करून संघ निवडला आहे, ज्यामध्ये बहुतेक खेळाडूंना या मोठ्या स्पर्धेत काय भूमिका बजवायची आहे याची पुरेशी माहिती आहे. शारीरिक क्षमता, कौशल्य आणि सांघिक खेळ हे निवडीचे निकष राहिलेले असले, तरी आम्ही ज्या महत्त्वाच्या पैलूंकडे लक्ष दिले आहे त्यापैकी एक दबावाखाली कामगिरी करण्याची त्यांची मानसिक क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतीय संघाचे नेतृत्व डिफेंडर रोहित करेल, ज्याने अलीकडेच मलेशियामध्ये झालेल्या सुलतान ऑफ जोहोर कपमध्ये चांगली कामगिरी केली होती. तिथे संघाने रौप्यपदक जिंकले होते. भारताच्या संघात बिक्रमजित सिंग आणि प्रिन्सदीप सिंग हे गोलरक्षक आहेत. भारताच्या बचावफळीत कर्णधार रोहित, कनिष्ठ विश्वचषकाच्या मागील आवृत्तीचा भाग असलेला अमीर अली तसेच अनमोल एक्का, रवनीत सिंग, तालेम प्रियो बार्ता, सुनील पलक्षप्पा बेन्नूर आणि शरदानंद तिवारी यांचा समावेश असून, त्यांच्याकडे बॅकलाइनमध्ये चांगला अनुभव आहे.
भारताच्या मिडफिल्डमध्ये अंकित पाल, रोहित कुल्लू, अद्रोहित एक्का, थौनाओजम इंगलेम्बा लुवांग, मनमीत सिंग आणि रोसन कुजूर असतील. तर आघाडी फळीत सौरभ आनंद कुशवाह, अर्शदीप सिंग, अजित यादव, दिलराज सिंग आणि गुरजोत असतील. गुरजोतने गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वरिष्ठ भारतीय संघातर्फे पदार्पण केले होते. दुर्दैवाने भारतीय संघाला खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेला मुकणाऱ्या अराईजित सिंग हुंडलच्या अनुभवाची उणीव भासेल.
कनिष्ठ विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने आम्हाला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा चांगला अनुभव मिळाला असून आम्ही वरिष्ठ भारतीय संघासोबतही बरेच सामने खेळलो आहोत. हा आमच्या तयारीचा एक मोठा भाग होता आणि जेव्हा खेळाडू त्यांच्या वरिष्ठ देशबांधवांविऊद्ध चांगली कामगिरी करतात तेव्हा त्यांना आपोआप आत्मविश्वास मिळतो. एकंदरित, आमचा संघ एक एक उत्साही संघ आहे आणि घरच्या प्रेक्षकांसमोर तो चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे, असे श्रीजेश यांनी सागितले आहे.