वनडे क्रमवारीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या वनडे मानांकनात भारतीय कर्णधार रोहित शर्माने एका स्थानाची बढती घेत दुसरे स्थान मिळविले आहे अलीकडेच झालेल्या लंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहितने शानदार प्रदर्शन केले, त्याचा त्याला लाभ झाला आहे. पाकचा बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. भारताने लंकेविरुद्धची वनडे मालिका 0-2 अशा फरकाने गमविली, पण रोहितने त्यात 52.33 धावांच्या सरासरीने 157 धावा जमविल्या. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. या मालिकेतील पहिला सामना टाय झाला होता. सलामीवीर शुभमन गिलची मात्र एका स्थानाने घसरण झाली असून तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे तर विराट कोहली चौथ्या स्थानावर कायम आहे. पाकचा बाबर आझम 824 मानांकन गुणांसह अग्रस्थानावर असून रोहितचे 765 मानांकन गुण आहेत. टॉप 20 मध्ये स्थान मिळविणाऱ्या भारतीय फलंदाजांत श्रेयस अय्यर (16 वे स्थान), केएल राहुल (21 वे स्थान) यांचा समावेश आहे. राहुलची एका स्थानाने घसरण झाली आहे.
गोलंदाजांमध्ये डावखुरा मनगटी स्पिनर कुलदीप यादव चौथ्या स्थानावर असून द.आफ्रिकेचा स्पिनर केशव महाराज पहिल्या, ऑस्ट्रेलियाचा जोश हॅझलवुड दुसऱ्या व त्याचाच सहकारी अॅडम झाम्पा तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रिम बुमराह आठव्या स्थानावर स्थिर आहे तर मोहम्मद सिराजची पाच स्थानाने घसरण झाली आहे. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टसमवेत तो संयुक्त नवव्या स्थानावर विसावला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 12 व्या स्थानावर असून तो सध्या बेंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापत पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. पुढील महिन्यात बांगलादेविरुद्ध होणाऱ्या कसोटीच्या मालिकेसाठी तो उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. लंकेविरुद्ध पाच बळी मिळविणारा वॉशिंग्टन सुंदर या क्रमवारीत 37 वा क्रमांक मिळविताना 10 स्थानांची प्रगती केली. अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजा 16 व्या तर हार्दिक पंड्या 26 व्या स्थानावर आहे. हार्दिकची चार स्थानाने घसरण झाली आहे. सांघिक क्रमवारीत भारतीय संघ 118 गुणांसह अग्रस्थानी कायम असून 116 गुणांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, 112 गुणांसह दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे.