‘सिएट’ पुरस्कार सोहळ्यात रोहित शर्माचा खास सन्मान
वृत्तसंस्था/ मुंबई
सीएट क्रिकेट रेटिंग (सीसीआर) पुरस्कारांची 27 वी आवृत्ती मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आयोजित करण्यात येऊन यामध्ये जगभरातील क्रिकेटपटू आणि माजी स्टार खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा केवळ त्याच्या ग्लॅमरस लूकसाठीच नव्हे, तर या कार्यक्रमादरम्यान त्याला मिळालेल्या विशेष सन्मानामुळे देखील सर्वांच्या नजरेत भरला. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिल्याबद्दल रोहित शर्माला विशेष स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दोन आयसीसी जेतेपदे जिंकली, ज्याची सुऊवात 2024 मध्ये बार्बाडोसमध्ये झालेल्या प्रसिद्ध टी-20 विश्वचषक विजेतेपदापासून झाली. त्यानंतर या वर्षाच्या सुऊवातीला मार्चमध्ये झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकून त्यात भर टाकण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे भारताने एकही सामना न गमावता दोन्ही प्रतिष्ठित जेतेपदे जिंकली. रोहितने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करताना न्यूझीलंडविऊद्धच्या अंतिम सामन्यात 76 धावांची खेळी करत भारताला एक संस्मरणीय विजेतेपद मिळवून दिले.
19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर रोहितचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता. या अनुभवी धडाकेबाज फलंदाजाने दिग्गज सुनील गावस्कर यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला. रोहितच्या व्यतिरिक्त संजू सॅमसनला पुऊषांचा ‘टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवडण्यात आले, तर गूढ फिरकी गोलंदाज म्हणून विख्यात असलेल्या वऊण चक्रवर्तीला उत्कृष्ट टी-20 पुरुष गोलंदाज हा पुरस्कार देण्यात आला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून श्रेयस अय्यरलाही स्मृतिचिन्ह मिळाले. विदर्भाच्या रणजी ट्रॉफी विजेत्या हंगामात विक्रमी 69 बळी घेणाऱ्या हर्ष दुबेला वर्षातील सर्वोत्तम स्थानिक क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले, तर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणाऱ्या अंगक्रिश रघुवंशीने वर्षातील उदयोन्मुख युवा खेळाडूचा पुरस्कार जिंकला.
महिला गटात भारताने क्लीन स्वीप केला. दीप्ती शर्माला उत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय गोलंदाज म्हणून आणि सलामीवीर स्मृती मानधनाला उत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय फलंदाज म्हणून गौरवण्यात आले. इंग्लंडच्या हॅरी ब्रूकच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीला पुऊषांच्या गटातील उत्कृष्ट कसोटी फलंदाजाच्या पुरस्काराने मान्यता मिळाली. तर गोलंदाजांच्या गटात श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याची सरशी झाली. इंग्लंडचा फलंदाज ज्यो रूटला पुऊषांच्या गटातील उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या पुरस्काराने, तर वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराला तसेच भारताचे माजी लेगब्रेक गोलंदाज बीएस चंद्रशेखर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.