रोहीत शर्माचा नेटमध्ये सराव
वृत्तसंस्था / पर्थ
भारतीय क्रिकेट संघाचा नियमीत कर्णधार रोहीत शर्माने सोमवारी येथे नेटमध्ये बराचवेळा फलंदाजीचा सराव केला. बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने पर्थची पहिली कसोटी केवळ चार दिवसांत जिंकण्याचा पराक्रम सोमवारी केला.
कर्णधार रोहीत शर्माला पुत्ररत्न प्राप्त झाल्याने तो पर्थच्या पहिल्या कसोटीत खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील बॉर्डर-गावसकर चषकासाठी या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी अॅडलेडमध्ये दिवसरात्रीची खेळविली जाणार आहे. या कसोटीत रोहीतचा समावेश राहिल.
पर्थच्या मैदानात रोहीतने बराचवेळ फलंदाजीचा सराव केला. या सरावातील व्हिडीओ छायाचित्रे बीसीसीआयने प्रसारीत केली. या सरावामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीचा फलंदाज डेव्हीड वॉर्नरने आपली उपस्थिती दर्शवून रोहीतला प्रोत्साहन दिले. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील यापूर्वी झालेल्या बॉर्डर-गावसकर चषकासाठीच्या कसोटी सामन्यामध्ये रोहीतने सात सामन्यात 31.38 धावांच्या सरासरीने 408 धावा जमविताना तीन अर्धशतके झळकविली. अलिकडच्या कालावधीत रोहीतने फलंदाजीचा सूर गमविल्याने तो पुन्हा मिळविण्यासाठी झगडत आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्ध झालेल्या पाच कसोटी सामन्यात रोहीत शर्माने 10 डावांत केवळ 133 धावा जमविल्या आहेत. रोहीतने अलिकडच्या कालावधीत 11 कसोटीत 21 डावांत 588 धावा जमविल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप 2023 -25 च्या स्पर्धा अंतर्गत मालिकांमध्ये रोहीतने 14 कसोटीत 3 शतके आणि 4 अर्धशतकांसह 833 धावा जमविल्या आहेत.