रोहित शर्मा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार : माजी प्रशिक्षक राहुल द्रविड जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
वृत्तसंस्था/मुंबई
येथे झालेल्या सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार 2023-24 वितरण सोहळ्यात भारती कर्णधार रोहित शर्माला पुरुष विभागातील वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तर माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताचा फलंदाजीतील आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीला वनडेतील सर्वोत्तम फलंदाज तर मोहम्मद शमीला वनडेतील सर्वोत्तम गोलंदाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2023 मधील वनडे वर्ल्ड
कपमध्ये त्याने सर्वाधिक 24 बळी मिळविले होते. यावर्षी इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच कसोटींच्या मालिकेत यशस्वी जैस्वाल शानदार कामगिरी करीत 712 धावा जमविल्या. या कामगिरीसाठी त्याला वर्षातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज तर फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला वर्षातील सर्वोत्तम कसोटी गोलंदाज पुरस्कार प्रदान करण्यात आला. तामिळनाडू रणजी संघाचा कर्णधार आर. साई किशोरला देशी क्रिकेटमधील वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला. मागील मोसमात त्याच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू संघाने रणजी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
टी-20 प्रकारात न्यूझीलंडच्या टिम साऊदीला या प्रकारातील वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार तर इंग्लंडच्या फिल सॉल्टला वर्षातील सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम केल्याबद्दल तिलाही स्मृतिचिन्ह देण्यात आले. तिची सहकारी व उपकर्णधार स्मृती मानधनाला वर्षातील सर्वोत्तम भारतीय महिला फलंदाजाचा तर दीप्ती शर्माला वर्षातील सर्वोत्तम भारतीय महिला गोलंदाजाचा पुरस्कार देण्यात आला. महिलांच्या कसोटीमध्ये सर्वात वेगवान द्विशतक नोंदवल्याबद्दल सलामीवीर शेफाली वर्माला स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वर्षाच्या प्रारंभी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नई कसोटीत शेफालीने 194 चेंडूत द्विशतक नोंदवले होते. केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. या संघाचे उत्कृष्ट नेतृत्व केल्याबद्दल श्रेयसलाही स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.