रोहितने आणखी दोन वर्षे नेतृत्व सांभाळण्याची गरज
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची अंतिम लढत गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला रविवारी रात्री त्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाशी हस्तांदोलन करत मोटेरा स्टेडियमच्या लांबलचक पायऱ्या चढताना खूप एकटे वाटले असेल. हा पराभव त्याला छातीवर केलेल्या वारासारखा वाटला असेल. त्यामुळे त्याने ते क्षेत्र लवकर सोडले. रोहित शर्मासाठी या पराभवाने सारे विश्वच संपल्यागत वाटले असले, तरी भारतीय क्रिकेट संघाला क्रिकेटच्या मोठ्या स्वरुपांत आणखी दोन वर्षे त्याच्या नेतृत्वाची गरज आहे.
2007 मध्ये जेव्हा राहुल द्रविडचा कर्णधारपदाचा कार्यकाळ संपला, तेव्हा धोनी संघात त्याची जागा घेण्याच्या दृष्टीने तयार होता आणि जेव्हा धोनीने कर्णधारपद सोडण्याची वेळ आली तेव्हा विराट कोहलीच्या रूपात उत्तराधिकारी आधीच तयार होता. त्याचप्रमाणे कोहलीकडून जबाबदारी घेण्यास रोहित तयार झाला होता. पण सध्याच्या संघातील युवा खेळाडू नेतृत्वाची जबाबदारी घेण्यापासून बरेच दूर आहेत. त्यामुळे निवड समितीसमोर रोहितला कर्णधारपदी ठेवण्यापासून पर्याय नाही.
प्रशिक्षक राहुल द्रविडची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर रोहित संघात किती गुंतला होता ते लक्षात येते. त्यामुळे रविवारचा पराभव त्याला जास्त जिव्हारी लागला असावा. तो एक अपवादात्मक कर्णधार राहिला. रोहितने खरोखरच या संघाचे उत्कृष्टरीत्या नेतृत्व केले. त्याने ड्रेसिंग रूममध्ये आपला बराच वेळ आणि ऊर्जा खेळाडूंसाठी खर्च केली. आमच्या कोणत्याही संभाषणासाठी, आमच्या कोणत्याही बैठकीसाठी तो नेहमीच उपलब्ध असायचा, असे द्रविडने सामन्यानंतर सांगितले.
रोहित शर्माने गेल्या सहा आठवड्यांमध्ये सलामीला धाडसी फलंदाजी करून, गोलंदाजांचा प्रभावीपणे वापर करून आणि तणावपूर्ण क्षण आले असता वेळोवेळी विनोदाची उधळण करून सर्वांची मने जिंकली. ‘त्याने आपला बराचसा वैयक्तिक वेळ, ऊर्जा या मोहिमेसाठी दिली आणि त्याला नेतृत्वास साजेशी कामगिरी करायची होती. संपूर्ण स्पर्धेत त्याने याबबतीत उत्कृष्ट कामगिरी केली, असे द्रविड पुढे म्हणाला.
रोहितचे वय सध्या 36 पेक्षा जास्त आहे आणि 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणार असलेल्या विश्वचषक स्पर्धेवेळी तो 40 वर्षांचा असेल. कदाचित एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी त्याला हुकली आहे. पण त्याला पर्याय पटकन शोधण्याऐवजी भारतीय क्रिकेटच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील दोन वर्षांसाठी रोहितकडे संघाचे नेतृत्व कायम ठेवले आणि त्यानंतर संक्रमण प्रक्रिया सुरू केली, तर ते भारतीय क्रिकेटसाठी खूप मोलाचे ठरेल.