मुस्लीमबहुल इंडोनेशियात रोहिंग्या शरणार्थी संकटात
संतप्त विद्यार्थ्यांकडून शिबिरावर हल्ला
वृत्तसंस्था /जकार्ता
इंडोनेशियात म्यानमारचे नागरिक असलेल्या रोहिंग्या शरणार्थींना जोरदार विरोध होत आहे. इंडोनेशिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बांदा आचे या शहरातील रोहिंग्यांच्या शिबिरावर हल्ला केला आहे. या शरणार्थींना देशाबाहेर हाकलण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. हल्ल्यानंतर शरणार्थींना अनेक ट्रकमधून इतरत्र नेण्यात आले. आश्रय शिबिरावर झालेल्या हल्ल्यामुळे आम्ही चिंतेत आहोत. जमावाने पोलिसांचे कडे तोडून 137 शरणार्थींना बळजबरीने दोन ट्रकमध्ये भरून दुसऱ्या ठिकाणी नेले आहे. या घटनेमुळे शरणार्थींमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघ शरणार्थी एजेन्सीने सांगितले आहे. इंडोनेशियाच्या एका सरकारी हॉलमध्ये सुमारे 137 रोहिंग्या वास्तव्य करत होते. या रोहिंग्यांना स्थानिक इमिग्रेशन ऑफिसमध्ये नेते देशाबाहेर हाकलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. ही घटना ऑनलाइन चुकीची माहिती आणि हेट स्पीचनंतर घडल्याचा दावा युएनएचआरसीकडून करण्यात आला आहे. पश्चिम म्यानमारचे रहिवासी असलेले रोहिंग्या मुस्लीम हे आता आसपासच्या देशांमध्ये आश्रय मिळवू पाहत आहेत. मुस्लीबहुल इंडोनेशिया आणि मलेशियासोबत फिलिपाईन्स, बांगलादेश आणि भारतातही रोहिंग्यांचे वास्तव्य आहे.