बायणात महिलेचा खून रोहम अलीला अटक
वास्को : बायणात रविवारी दुपारी एका वृध्द महिलेवर सुऱ्याचे वार करून तिचा खून करण्यात आला. याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी एका युवकाला अटक केलेली आहे. मयत महिलेचे नाव मेहरूनिसा बिडीकर (64) असे आहे. तिचा खून करणाऱ्या संशयित युवकाचे नाव रोहम अली (21) असे असून तो आसाम राज्यातील आहे. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी दोनच्या सुमारास बायणातील ‘नाईक बिल्डींग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीर्ण इमारतीत ही घटना घडली. या इमारतीत एका युवकाने दुपारच्या वेळी प्रवेश केला आणि तो थेट गच्चीवर जाण्यासाठी बंद दरवाजा ठोठावू लागला. मोठमोठ्याने दरवाजा ठोठावण्याचा आवाज येत असल्याने मेहरूनीसा ही महिला गच्चीवर गेली. तिने त्या युवकाला जाब विचारला.
तेव्हा तो तिच्याशी वाद घालू लागला. त्यामुळे तिने खाली जाऊन शेजाऱ्याला सांगून त्याला हाकलण्यास सांगितले. त्या शेजारच्या माणसाशीही तो युवक वाद घालू लागला. त्यामुळे तिने जाणार नसशील तर पोलिसांना बोलवू अशी त्याला भिती घातली आणि ती पुन्हा इमारतीखाली आली. तोपर्यंत त्या युवकाने महिलेच्या खोलीत प्रवेश केला. तो आपल्या खोलीत येऊन लपल्याचे तिला माहीत नव्हते. त्यामुळे ती बेसावधपणे आत शिरताच त्या युवकाने तिच्या मानेवर सुऱ्याने वार केले. त्यामुळे ती खाली कोसळली. त्यानंतर तो युवक दार बंद करून आतच बसला. सुऱ्याचे वार होताच त्या महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे खूनाचा प्रकार उघडकीस आला. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दरवाजा तोडून त्या युवकाला ताब्यात घेण्यात आले. संशयित युवकाने केवळ निघून जाण्यासाठी दटावल्याच्या शुल्लक रागातून त्या महिलेचा खून केला. सदर युवक चोर होता, दारूडा होता की मानसिक रूग्ण याचा उलगडा झालेला नाही. मुरगाव पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.