रॉबर्ट वड्रा यांना ईडीकडून पुन्हा समन्स
शस्त्रास्त्र दलाल संजय भंडारीशी संबंधित प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ईडीने काँग्रेस खासदार प्रियांका वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांना पुन्हा एकदा समन्स पाठविला आहे. फरार शस्त्रास्त्रदलाल संजय भंडारीशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी वड्रा यांना बोलाविण्यात आले आहे. भंडारी हा 2016 मध्ये भारतातून पसार झाला होता. सध्या तो ब्रिटनमध्ये असून त्याच्यावर विदेशातील संपत्तीची घोषणा न करणे आणि लाचखोरीचा आरोप आहे.
संजय भंडारीवर अनेक भारतीय कायद्यांचे उल्लंघन करण्याचाही आरोप आहे. यात पीएमएलए, काळा पैसाविरोधी कायदा आणि ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट सामील आहे. ईडी याप्रकरणी तपास करत आहे. तर भारत सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या प्रत्यार्पण कार्यवाहीला भंडारीने विरोध केला आहे. भंडारी हा रॉबर्ट वड्राचा निकटवर्तीय असल्याचा दावा करण्यात येतो. ईडी वड्रा यांची याचप्रकरणी चौकशी करू इच्छित आहे.
भंडारीची दुबईतील कंपनी ऑफसेट इंडिया सोल्युशन्स एफझेडसीच्या खात्यात कथित स्वरुपात 310 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. या रकमेचा वापर दुबई आणि लंडनमध्ये संपत्ती खरेदी करण्यासाठी करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आले. ईडीने भारतातील भंडारीची 26 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याची संपत्ती जप्त करत एक आरोपपत्रही दाखल केले आहे. वड्रा यांचे नाव लंडनमध्ये एका संपत्तीच्या खरेदीशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातही समोर आले आहे. चौकशीदरम्यान वड्रा यांनी स्वत:वरील आरोप फेटाळले होते.