रॉबर्ट वड्रा यांना ईडीकडून पुन्हा समन्स
आज होणार चौकशी : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ईडीने काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांना पुन्हा समन्स जारी केला आहे. ईडीने रॉबर्ट वड्रा यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वड्रा यांची ही चौकशी होणार आहे. फरार शस्त्रास्त्र दलाल संजय भंडारीशी निगडित हे प्रकरण असून त्याच्यासोबत रॉबर्ट वड्रा यांचे कनेक्शन असल्याचे सांगण्यात येत आहे.
पीएमएलए अंतर्गत याप्रकरणी चौकशी होत आहे. ईडीने यापूर्वीही रॉबर्ट वड्रा यांना समन्स जारी करत 10 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. आजारी असून कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याचे सांगत रॉबर्ट वड्रा यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास त्यावेळी नकार दिला होता.
तर रॉबर्ट वड्रा हे ईडीसमोर उपस्थित राहण्यास तयार आहेत. चालू महिन्यात ते विदेशात जाणार आहेत. अशास्थितीत या प्रवासापूर्वी किंवा नंतर ते ईडीसमोर उपस्थित राहू शकतात असे त्यांच्या वकिलाने नमूद केले होते. वड्रा यांची चौकशी केल्यावरच ईडी याप्रकरणी आरोपपत्र दाखल करणार असल्याचे मानले जात आहे.
एप्रिल महिन्यात ईडीने सलग तीन दिवस वड्रा यांची चौकशी केली होती. परंतु ही चौकशी हरियाणातील एका जमीन व्यवहाराप्रकरणी करण्यात आली होती. हा व्यवहार 2008 साली झाला होता. आतापर्यंत वड्रा यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या तीन प्रकरणांमध्ये तपास सुरू आहे. तर संजय भंडारी याच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने 2016 साली छापे टाकले होते. या कारवाईनंतर संजय भंडारीने देशातून पळ काढला होता. भारताने भंडारीच्या प्रत्यार्पणासाठी अर्ज केला होता, परंतु ब्रिटिश न्यायालयाने तो फेटाळला होता.
संजय भंडारीने 2009 साली लंडन येथे ब्रायनस्टन स्क्वेयर हाउस खरेदी केले होते. यानंतर याचे नुतनीकरण रॉबर्ट वड्राच्या निर्देशानुसार केले होते, याकरता निधीही वड्रा यांच्याकडून देण्यात आला होता असा आरोप ईडीने 2023 मध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात आहे.