कॉल सेंटरद्वारे लूट, मात्र मुख्य संशयितांनाच सूट?
स्थानिक पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, रिसॉर्टचालकाला पळून जाण्यास मदत; चौदा दिवसांनंतरही या प्रकरणातील संशय अधिक गडद
बेळगाव : बेळगावात बसून अमेरिकन नागरिकांना ठकविणाऱ्या आझमनगर येथील कॉल सेंटरवर छापा टाकून चौदा दिवस उलटले. इमारत मालकासह 34 जणांना अटक झाली आहे. चौदा दिवसांनंतरही या प्रकरणातील संशय अधिक गडद होत चालला आहे. दांडेली येथील एका रिसॉर्टचालकाची सुटका कोणी केली? असा प्रश्न उपस्थित केला जात असून पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
एपीएमसी पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आझमनगर येथील कुमार हॉलवर 11 नोव्हेंबर रोजी रात्री सायबर क्राईम व एपीएमसी पोलिसांनी छापा टाकून कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 33 जणांना अटक करून त्यांच्याजवळून 37 लॅपटॉप, 37 मोबाईल, 3 वायफाय रुटर जप्त केले होते. या प्रकरणातील चौघांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्या चौघांची पुन्हा हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. उर्वरित काही आरोपींनाही पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. केवळ आंतरराज्य नव्हे तर आंतराष्ट्रीय पातळीवरील हा गुन्हा असल्यामुळे या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. बेंगळूर येथे गेल्या महिन्यात एका कॉल सेंटरवर छापा टाकून बेळगाव येथील तरुणासह दोघा जणांना अटक करण्यात आली होती.
विदेशी आयपी अॅड्रेस वापरून एका खासगी फायनान्स कंपनीच्या बँक खात्यातील 48 कोटी रुपये हडप करण्यात आले होते. आझमनगर येथील ईस्माईल अत्तार (वय 27) व उदयपूर राजस्थान येथील संजय पटेल (वय 43) या दोघा जणांना अटक करण्यात आली होती. उर्वरित आरोपींचाही बेंगळूर येथील सीसीबीचे अधिकारी शोध घेत आहेत. बेंगळूर येथील कारवाईनंतर अंतर्गत सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीमुळे अमेरिकन नागरिकांना ठकविणाऱ्या बेळगाव येथील कॉल सेंटरचा उलगडा झाला आहे. कुमार हॉल येथील कॉल सेंटरवर छापा टाकल्यानंतर दांडेलीचा एक रिसॉर्टचालक तेथे जात होता. दोन दिवस पोलीस स्थानकात त्याच्या फेऱ्या होत्या. पोलीस अधिकाऱ्यांनीच कारवाई टाळण्यासाठी त्याला पळविल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यानंतर इमारत मालकाला अटक करण्यात आली आहे. रिसॉर्टचालकाला पळविण्यासाठी गुजरातमधून हवालाच्या माध्यमातून मोठी रक्कम मागवून दिल्याची माहिती मिळाली आहे.
एकीकडे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील फसवणूक प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपासासाठी सर्व यंत्रणा कामाला लावलेल्या असतानाच काही पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दडपण्यासाठी सुरुवातीलाच गुन्हेगारांबरोबर हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. त्यामुळेच या प्रकरणातील मुख्य संशयित फरारी झाला आहे. गुजरातमधील या प्रकरणाच्या किंगपिनशी दांडेलीच्या रिसॉर्टचालकाची मैत्री आहे. या मैत्रीतूनच बेळगावात कॉल सेंटर सुरू करण्याचा विचार पुढे आला. इमारत मालकाला गाठून भाडे ठरविण्यात आले. रिसॉर्टचालकाला ताब्यात घेतले असते तर कॉल सेंटर थाटणाऱ्या गुजरात व पश्चिम बंगालमधील मुख्य संशयितांचा विनाविलंब शोध लागला असता. कारण, रिसॉर्टचालकच मुख्य दुवा असल्याचे समजते.
बॉक्साईट रोड परिसरात रिसॉर्टचालकाचे एक हॉटेल आहे. या हॉटेलमधून कॉल सेंटरमधील कामगारांना नाश्ता व जेवण पुरविले जायचे. पोलिसांनी छापा टाकल्यानंतरही त्याच्याच हॉटेलमधून जेवण मागविण्यात येत होते. ही गोष्ट स्थानिक पोलिसांना माहिती होती. तरीही त्याला पळविण्यात आले आहे. संशयिताला पळविण्यासाठी पंधरा लाखांचा व्यवहार कोणी केला? असा प्रश्न उपस्थित केला जात असून आम्ही पैसे मोजूनही आमच्यावर कारवाई का केली जात आहे? अशी विचारणा करीत एका संशयिताने थयथयाट केल्याचीही माहिती मिळाली आहे.
एपीएमसी पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर हे कॉल सेंटर सुरू होते.कॉल सेंटरसमोरच नेहमी पोलिसांची वर्दळ रहात होती. तरीही त्यांना त्याची माहिती कशी मिळाली नाही? याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास धक्कादायक बाबींचा उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी बेळगावात झालेल्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्यात आली होती. सीआयडीच्या तपासात काही पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग उघडकीस आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली होती. आताही संपूर्ण प्रकरणात स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद असून आंतरराष्ट्रीय पातळीवर फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांच्या रॅकेटची खोलवर चौकशी करण्याऐवजी संशयितांना सोडून देणाऱ्यांची झाडाझडती घेतली पाहिजे.
दोन कारवाया मात्र दोन्ही वाया?
11-11-2025 रोजी झालेल्या दोन कारवाया सध्या ठळक चर्चेत आहेत. बेळगाव ग्रामीण पोलिसांकडून बेनकनहळ्ळी येथील एका जुगारी अड्ड्यावर छापा टाकण्यात आला होता. दहा जणांना अटक करून 53 हजार 600 रुपये जप्त करण्यात आले होते. ही कारवाईही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात खिसा गरम करून घेऊन काही जणांची सन्मानाने सुटका केल्याचा आरोप आहे. यासंबंधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याचदिवशी कॉल सेंटरवरही छापा टाकण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या या दोन कारवाया संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.