For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एटीएममध्ये पैसे भरणारे वाहन अडवून 7.11 कोटींचा दरोडा

07:00 AM Nov 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
एटीएममध्ये पैसे भरणारे वाहन अडवून 7 11 कोटींचा दरोडा
Advertisement

बेंगळुरात दिवसाढवळ्या कृत्य : आरबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून लूट

Advertisement

बेंगळूर : बेंगळूरमध्ये दरोडेखोनांनी दिवसाढवळ्या 7.11 कोटी रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी एका टोळीने इनोव्हा कारमधून पाठलाग करून एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जाणारे वाहन अडविले. त्यातील कर्मचाऱ्यांना रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून रोकड लांबविले. या सिनेस्टाईल दरोड्यामुळे बेंगळूर शहरात खळबळ माजली असून पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध जारी केला आहे.

बेंगळूरच्या साऊथ एन्ड सर्कलजवळ एटीएमच्या दिशेने निघालेले सीएमएस एजन्सीच्या वाहनाला इनोव्हातून आलेल्या सहा-सात जणांच्या टोळीने अडविले. आपण आरबीआयचे अधिकारी असल्याचे सांगितले. तुम्ही नियमांचे उल्लंघन केले आहे. पोलीस स्थानकात या असे धमकावून गनमॅनसह उर्वरितांना तेथेच उतरवून सीएमएस वाहनासह चालकाला डेअरी सर्कलवरील फ्लायओव्हर नेले. तेथे वाहनातील 7 कोटी 11 लाखांची रोकड इनोव्हा कारमध्ये भरून पोबारा केला. यासंबंधी माहिती मिळताच सुद्दगुंटेपाळ्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास हाती घेतला आहे.

Advertisement

एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जात असलेल्या वाहनात वाहनचालक, दोन गनमॅन आणि रोकड एटीएममध्ये जमा करणारा असे चार कर्मचारी होते. त्यांची सिद्धापूर पोलीस स्थानकात चौकशी करण्यात येत आहे. ठसेतज्ञ आणि श्वानपथकाच्या मदतीने पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध जारी केला आहे. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. दरोडेखोरांनी होसकोटेच्या दिशेने पलायन केल्याची माहिती प्राथमिक तपासातून मिळाली आहे.

इनोव्हाला बनावट नंबरप्लेट

दरोडेखोरांनी वापरलेल्या इनोव्हा कारला बनावट नंबरप्लेट वापरल्याचे समोर आले आहे. केए 03 एनसी 8052 या क्रमांकाच्या कारमधून दरोडेखोर आले होते. मात्र, कारला वापरलेली नंबरप्लेट मारुती सुझुकी कंपनीच्या एका कारची असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दरोडेखोरांनी पूर्वनियोजन करूनच हे कृत्य केल्याचे स्पष्ट आहे.

संशयितांचे फोटो जारी

घटनेविषयी पत्रकारांशी बोलताना बेंगळूर शहर पोलीस आयुक्त सीमंतकुमार सिंग म्हणाले, सिद्धापूर पोलीस स्थानक हद्दीत ही घटना घडली आहे. उपलब्ध माहितीनुसार 7 कोटी रुपये लुटण्यात आले आहेत. सीएमएस वाहनचालकाची चौकशी केली जात आहे. संशयितांचा सुगावा लागला असून 6 जणांचे फोटो जारी करण्यात आले आहेत.

दरोडेखोरांना पकडल्याशिवाय राहणार नाही!

बेंगळुरातील दरोडा प्रकरणासंबंधी धागेदोरे मिळाले आहेत. आरोपींना पकडल्याशिवाय राहणार नाही. एटीएममध्ये पैसे भरण्यात येणार असल्याची माहिती दरोडेखोरांना आधीच मिळाली. ही माहिती देणारे कोण आहेत, याचा तपास सुरू आहे. पैसे भरणाऱ्यांपैकीच कोणी आहेत का, याचा तपासही केला जात आहे. तपासाच्या गौप्यतेसाठी सर्व माहिती देणे शक्य नाही.

- डॉ. जी. परमेश्वर, गृहमंत्री

Advertisement
Tags :

.