Sangli Crime : चोरी करुन दरोडा टाकणारी टोळी तासाभरात जेरबंद, पोलीसांची धडक कारवाई
पाच जणांबरोबर एका अल्पवयीनाचाही या गुह्यात समावेश
सांगली : जबरी चोरी करून दरोडा टाकणाऱ्या पाचजणांना विश्रामबाग पोलिसांनी एका तासात अटक केली. त्यांच्याकडून एकूण 92 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका तासात या संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व संशयिताची वये ही 20 वर्षाच्या आतील आहेत. या पाच जणांबरोबर एका अल्पवयीनाचाही या गुह्यात समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील टिंबर परिसरात असणाऱ्या गोकुळनगरात काही युवकांना जबरदस्तीने या पाच जणांच्या टोळीने लुटले होते. तसेच त्यांच्याकडील महागडे मोबाईल, चेन आणि इतर किमती साहित्य काढून घेतले होते. त्यानंतर तत्काळ त्यांच्यामधील एकाने याची फिर्याद विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याची माहिती घेतली आणि त्यांनी तत्काळ शोध सुरू केला.
यावेळी त्यांना लुटमार करणारे हे मीरा हौसिंग सोसायटीमध्ये बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. येथे अदित्य रमेश भारती (वय 20, रा. तिवारी गल्ली सांगली), रोहित रमेश देशपांडे (वय 24, रा. विठ्ठल कॉलनी शामरावनगर सांगली), इरफान जहागिर मुल्ला (वय 21, रा. जनता बँक कॉलनी, शामरावनगर सांगली), आर्यन चंद्रकांत नाईक (वय 19, रा. पाटणे गल्ली खणभाग सांगली), योगेश धनंजय शिंदे (वय 21, रा. लालगे गल्ली खणभाग सांगली) यांच्यासह आणखी एक अल्पवयीन मुलगा बसला होता.
या सर्वांना ताब्यात घेतले असता त्यांनीच हा दरोडा टाकल्याची माहिती दिली. त्यांनी लुटलेला मालही काढून दिला. त्यानंतर या पाच जणांना अटक केली तर अल्पवयीनाला ताब्यात घेतले. ही कारवाई विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने, पोलीस उपनिरीक्षक सुजाता भोपळे, संदीप साळुंखे, अमर मोहिते, बिरोबा नरळे, प्रशांत माळी, महंमद मुलाणी, आर्यन देशिंगकर, योगेश पाटील, गणेश बामणे यांनी कारवाई केली.