दरोडे, गुन्हेगारीचे पोलीस दलासमोर आव्हान
राज्यात अलीकडच्या काही दिवसात दरोड्याच्या खूप साऱ्या घटना विविध ठिकाणी घडल्या आहेत. बिदर, मंगळूर, विजापूर येथे अशा घटना घडल्या असून यात परप्रांतीय गुन्हेगारांचा सहभाग समोर आला आहे. आंतरराज्य गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज असून पोलीस दलाने हे आव्हान पेलत योग्य ती कारवाई करत जनतेला दिलासा द्यायला हवा. दुसरीकडे दक्षिण कर्नाटकात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचामुळे जनतेत भीती पसरली आहे. सरकारने याबाबतीत लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
कर्नाटकात दरोड्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात बिदरमधील एटीएममध्ये पैसे घालण्यासाठी आलेल्या व्हॅनमधील दोघा जणांची हत्या करून 93 लाख रुपये पळविण्यात आले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळूरमधील कोटेकारू व्यवसाय सेवा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना पिस्तूल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून 12 कोटी रुपयांचे दागिने पळविण्यात आले आहेत. याच दरम्यान विजापूरमध्ये एका घरावर पाच जणांच्या टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. झटापटीत घरमालक जखमी झाला आहे. बिदर, मंगळूर, विजापूर येथील घटनेनंतर म्हैसूरजवळ कार अडवून कारमधील दीड लाख रुपये दरोडेखोरांनी पळविले आहेत. हुबळी येथील अमरगोळ एपीएमसी आवारातील कॅनरा बँकेत चोरीचा प्रयत्न झाला आहे. केवळ आठ दिवसात झालेल्या या घटना लक्षात घेता कर्नाटकात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळत चालली आहे, हे लक्षात येते. या बहुतेक दरोडे प्रकरणात परप्रांतीय गुन्हेगारांचा सहभाग आढळून आला आहे.
बिदर येथे गोळीबार करून 93 लाख रुपये पळविण्याची योजना बिहारमध्ये आखली गेली. मंगळूर येथील बँक दरोड्याचा कट मुंबईत रचला. विजापूरमध्ये वावरणारी दरोडेखोरांची टोळी मध्यप्रदेशमधील असल्याचे उघडकीस आले आहे. एका दरोडेखोरावर गोळीबार करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मंगळूर बँक दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी कन्नन मणी (वय 36), मुरगंडी तिवार (वय 34), योशुवा राजेंद्रन (वय 35) या तिघाजणांना अटक करण्यात आली आहे. धारावी गँगच्या नावाने ही टोळी ओळखली जाते. पोलिसांनी कन्नन मणीवर गोळीबार केला आहे. गोळीबारात तो जखमी झाला आहे. बहुतेक प्रकरणात मुंबई, तामिळनाडू, बिहार, मध्यप्रदेशमधील गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारवर टीका केली आहे. कर्नाटकात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळल्याचा आरोप भाजपने केला आहे. गेल्या दोन आठवड्यात अनेक घटना घडल्या आहेत. विजापुरात वीटभट्टी मालकाने कामगारांवर अमानुषपणे हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या सर्व घटना लक्षात घेता पोलीस दलाला आणखी सतर्क करण्याची गरज निर्माण झाली आहे.
म्हैसूरजवळील कार दरोड्यामध्ये केरळमधील गुन्हेगारांचा सहभाग आढळून आला आहे. यापूर्वी अशा अनेक घटनांचा कर्नाटक पोलिसांनी छडा लावला आहे. गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावून गुन्हेगारी थोपवण्यात पोलीस दलात अनेक दक्ष अधिकारी आहेत. अलीकडे पोलीस दलालाच मरगळ आली आहे. बदल्यांसाठी राजकीय हस्तक्षेप, आपल्याला हवे त्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी करावा लागणारा खर्च, खर्च करून एखाद्या पोलीस स्थानकावर नियुक्ती करून घेतल्यानंतर केलेल्या खर्चाची वसुली करण्यासाठी करावी लागणारी पिळवणूक आदींमुळे पोलीस अधिकारी मरगळले आहेत की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अधूनमधून बॉर्डर क्राईम मिटिंग घेतली जाते. गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांवर नजर ठेवण्याबरोबर आंतरराज्य गुन्हेगारांबद्दल माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी या बैठका होत असतात. आंतरराज्य गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी असे प्रयत्न आणखी वाढवण्याची गरज आहे. कर्नाटकात गेल्या आठ-दहा दिवसात घडलेल्या बहुतेक दरोड्यांची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. सर्वसामान्य माणसांना भीती वाटावी अशीच ती दृश्ये आहेत.
अलीकडच्या काही वर्षात परप्रांतीय गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. बेंगळूरमध्ये गायींचे आचळ कापल्याची घटना घडली. या घटनेत बिहारमधील माथेफिरुचा सहभाग होता. खरेतर गायींवर हे अत्याचार करण्याची काहीच गरज नव्हती. या घटनेनंतर कर्नाटकात गायींची शेपूट कापणे व गायींवर अत्याचाराचे प्रकार सुरू झाले आहेत. राजधानीत झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातही बिहारी गुन्हेगाराचा सहभाग आढळून आला आहे. संघराज्याच्या संकल्पना मान्य केल्यानंतर कोणत्याही राज्यातील नागरिक कोणत्याही राज्यात मुक्तपणे जाऊ शकतात. उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या राज्यातील मजूर दुसऱ्या राज्यात जातात, हे चालतच आले आहे. एका-दोघा जणांनी गुन्हेगारी कारवाया केल्या म्हणून सर्व परप्रांतीयांना गुन्हेगार ठरवणे योग्य नसले तरी केवळ गुन्हेगारीसाठीच कर्नाटकात येणाऱ्या परप्रांतीय गुन्हेगारांवर पोलिसांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे.
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर हे अनुभवी नेते आहेत. यापूर्वीही त्यांनी समर्थपणे गृहखाते सांभाळले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. पोलीस ठाण्यांना रियल इस्टेटचे अ•s बनवू नका, समस्या घेऊन येणाऱ्या सर्वसामान्यांना न्याय मिळेल, असे वातावरण पोलीस ठाण्यांमध्ये असले पाहिजे. पोलीस अधिकारी व नागरिक यांच्यातील दरी कमी झाली पाहिजे, असा सल्ला अनेकवेळा त्यांनी दिला आहे. अलीकडच्या काही अधिकाऱ्यांचे वेग लक्षात घेता पोलीस दलात दाखल होणे म्हणजेच पुढच्या अनेक पिढ्यांसाठी संपत्ती कमावण्यासाठीच नोकरीला लागणे या समजुतीने येणाऱ्यांची संख्याच अधिक आहे.
कर्नाटकाच्या दक्षिणेत मायक्रो फायनान्सचा जाच वाढला आहे. या जाचामुळे अनेकांनी आत्महत्या केली आहे. रामनगर तालुक्यात तर मायक्रो फायनान्सच्या त्रासाला कंटाळून गावचे गाव आपल्या घराला कुलूप लावून निघून गेले आहेत. यशोदम्मा (वय 60) नामक एका वृद्धेने आत्महत्या केली आहे. गरीब व मध्यमवर्गीय यांच्या अडचणी मायक्रो फायनान्समुळे वाढल्या आहेत. आजवर खासगी सावकारीच्या माध्यमातून गरीबांची पिळवणूक होत होती. घेतलेल्या पैशांच्या अनेकपटीने परतफेड करूनही तुमचे देणे अजून आहे, असे सांगत खासगी सावकार नागरिकांना लुटत होते. ते काम आता मायक्रो फायनान्सचालक करू लागले आहेत. मायक्रो फायनान्सना वेसण घालण्यासाठी नवा कायदा करण्याची तयारी सरकारने केली आहे.
सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील पक्षांतर्गत बंडाळी, एकमेकांचे अस्तित्व संपविण्यासाठी सुरू असलेल्या कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या आदींमुळे राजकीय नेत्यांना गुन्हेगारी घटनांकडे गांभीर्याने पाहण्यास वेळ नाही. परिस्थिती अशीच राहिली तर कायदा व सुव्यवस्था आणखी बिघडण्याचाच धोका अधिक आहे. गेल्या महिन्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे स्थगित करण्यात आलेला जय बापू, जय भीम, जय संविधान मेळावा मंगळवारी 21 जानेवारी रोजी बेळगाव येथे घेण्यात आला. एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार प्रियांका गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते या मेळाव्यासाठी बेळगावात आले होते. मेळावा यशस्वी झाला. तरी काँग्रेसमधील सत्तासंघर्ष या मेळाव्यातही लपून राहिला नाही.