मच्छे येथे रात्रीत तीन ठिकाणी चोरी
चोरट्यांनी कॅन्टीन, पानपट्टीचे दुकान फोडले : मंदिरातील दानपेटीही लांबविली
वार्ताहर/किणये
मच्छे येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाली आहे. चहाचे कॅन्टीन, पानपट्टीचे दुकान फोडले तर साई मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबविली आहे. हे चोरीचे प्रकार सोमवारी मध्यरात्री घडले असून मंगळवारी सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. एकाच रात्री झालेल्या धाडसी चोरीच्या प्रकारांमुळे मच्छे भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मच्छे बायपास रस्त्याजवळील नेहरुनगर येथे अनिल दिनेश घाटगे यांचे श्री समर्थ अमृततुल्य चहाचे कॅन्टीन आहे. या कॅन्टीनमध्ये चोरी झाली आहे. चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री कॅन्टीनच्या पाठीमागील पत्र्याचा काही भाग कापून कॅन्टीनमध्ये प्रवेश केला. कॅन्टीनमधील पितळ्dयाचे पाच हजार ऊपयांचे भांडे, तसेच सिगारेट, गुटखा व इतर साहित्य लांबविले आहे. पितळ्याचे भांडे व साहित्य आदी मिळून सुमारे वीस हजार ऊपयांचा ऐवज असल्याची माहिती अनिल यांनी दिली. मंगळवारी सकाळी कॅन्टीनकडे आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
भैरवनाथनगर, मच्छे येथील साई मंदिरात चोरट्यांनी प्रवेश करून मंदिरातील दानपेटी लांबवली आहे. हा चोरीचा प्रकारही सोमवारी मध्यरात्रीच झाला आहे. नेहमीप्रमाणे मंदिराची साफसफाई करण्यासाठी गल्लीतील एक आजीबाई आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लागलीच मंदिर कमिटीच्या कार्यकारी मंडळाला माहिती दिली. भैरवनाथनगर येथे नव्यानेच साई मंदिर बांधण्यात आले आहे. गेल्या नऊ महिन्यांपूर्वीच मंदिराचा उद्घाटन सोहळा झाला आहे. मंदिर उद्घाटनाच्या एक महिन्यानंतर दानपेटीतील रक्कम मंदिर ट्रस्टीने काढली होती. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून दानपेटीतील रक्कम बाहेर काढलेली नव्हती. चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ती फोडता आली नसल्यामुळे त्यांनी दानपेटीच उचलून नेली, अशी माहिती मंदिर कमिटीने दिली आहे. वडगाव ग्रामीण पोलिसांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच सीसीटीव्ही तपासले आहेत. मात्र सध्या तरी कोणताही सुगावा लागलेला नाही, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
30 हजारांच्या साहित्याची चोरी
मच्छे येथील महामार्गाजवळील पुलाच्या बाजूला एमआरपी दारूचे दुकान आहे. त्या दुकानच्या समोरच पानपट्टीचे दुकान आहे. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी पानपट्टीचे दुकान फोडले असून ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. पानपट्टीच्या दुकानासमोरील सिमेंटची भिंत फोडून, कुलूप तोडून पानपट्टी दुकानमध्ये प्रवेश केला. या पानपट्टीच्या दुकानातील कोल्ड्रिंक्स, सिगारेट, विविध प्रकारचे गुटखा, तसेच पाण्याच्या बाटल्या आदी साहित्य चोरट्यांनी लांबविले. यामुळे सदर दुकान चालविणाऱ्या अनंत साळुंखे यांनी सुमारे 30 हजार ऊपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची माहिती दिली आहे. वडगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.
चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करा...
मच्छे परिसरात एकाच रात्रीत तीन ठिकाणी झालेल्या चोरीच्या प्रकारांमुळे आजूबाजूचे व्यावसायिक व दुकानदार भयभीत झाले आहेत. अलीकडे मच्छे परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.