Sangli Crime : कुची येथे नातेवाईकाच्या घरी चोरी करणारा जेरबंद
कवठेमहांकाळ तालुक्यात कुची येथील चोरीचा पोलिसांनी उलगडा
सांगली: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील चोरीचा छडा लावला आहे. याप्रकरणी चोरटा प्रविण विठ्ठल निकम (वय ३२, रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) याला अटक करण्यात आली असून त्याने चोरलेले ७ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक संजीव झाडे यांनी दिली आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील सुरेखा अण्णासो पाटील यांचे कुटुंब दि. ८ डिसेंबर रोजी घराला कुलुप लावून परगावी गेले होते. ते दुसऱ्या दिवशी घरी परतल्यानंतर त्यांना घरातील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांत चोरीची नोंद केली.एआय इमेज या गुन्ह्याचा तपास करुन संशयीताला जेरबंद करण्याच्या सुचना पोलीस निरिक्षक झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाला दिल्या होत्या.
चोरट्याचा शोध सुरु असतानाच पथकातील पोलीस अंमलदार संदीप नलावडे, सोमनाथ गुंड आणि अमीरशहा फकीर यांना एकजण तानंग फाटा परिसरात दागिने विक्रीसाठी घुटमळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा लावून संशयीत प्रविण निकम याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत सोन्याचे साखळीत पदक असलेले चार तोळे वजनाचे गंठण, दोन तोळ्याचा सोन्याचा लक्ष्मीहार, मिनी गंठण, सोन्याची अंगठी आणि चांदीचे दागिने सापडले.
अधिक चौकशीत त्याने कुची येथे नातेवाईकांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली.
नातेवाईक घराला कुलुप लावल्यानंतर त्याची चावी कुठे ठेवतात, याची माहिती असल्याचा फायदा घेत संशयीत प्रविण निकम याने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्याला कवठेमहांकाळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पवार, हवालदार संदीप नलावडे, सोमनाथ गुंड, सागर लवटे, अमीरशहा फकीर, नागेश खरात, महादेव नागणे, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, अनिल कोळेकर, दरिबा बंडगर, सागर टिंगरे, सतीश माने, विक'म खोत, उदय माळी आदींच्या पथकाने यशस्वी केली.