इफ्फीत गुंजला ‘वंदे मातरम्’चा हुंकार
कोरियन संसद सदस्याने सगळ्यांना टाकले भारावून
पणजी : इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात कोरिया प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय संसदेच्या सदस्य जेवॉन किम यांनी केलेल्या ‘वंदे मातरम्’च्या भावपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांमधून उत्स्फूर्त दाद मिळाली. भारतात ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीताचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना किम यांची ही मनमोहक प्रस्तुती सर्वाना हर्षोल्हासित करुन गेली. या भावपूर्ण सादरीकरणाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले. किम यांनी मनापासून सादर केलेल्या या सादरीकरणाने या महोत्सवाला एक विशेष अर्थ मिळाला. भारताच्या सांस्कृतिक वारशाला समर्पित सौंदर्यपूर्ण आणि अतिशय मन:पूर्वक सादरीकरणानंतर सभागृहातील प्रेक्षकांनी त्यांना उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद तसेच मानवंदना दिली.
किम यांचे हे सादरीकरण म्हणजे भारत व कोरियाच्या मैत्रीची भावना आणि सांस्कृतिक सौहार्दाच्या भावनेचे प्रतीक होते, जे वेव्हज फिल्म बाजार सारख्या कार्यक्रमांनी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. किम यांनी कोरियन गाणे देखील सादर केले आणि दोन संस्कृतींमधील देवाणघेवाण कऊन कार्यक्रमाला एका अनोख्या उंचीवर नेले. यावेळी मंत्री डॉ. एल. मुऊगन यांनी किम यांची प्रशंसा केली. त्यांनी केवळ सादरीकरणच नव्हे, तर ‘वंदे मातरम्’ गीताची संपूर्ण आवृत्ती सादर केल्याबद्दल मुऊगन यांनी त्यांचे कौतुक केले. जगभरातील चित्रपट निर्माते, क्रिएटर्स, प्रतिनिधी आणि कथाकारांचा समावेश असलेल्या या सोहळ्यात किम यांची हृदयस्पर्शी प्रस्तुती ठळकपणे दिसून आली. तसेच एखादी कलाकृती आणि भावना सीमा ओलांडून किती सहजपणे प्रवाहित होतात याची ती एक सुरेल आठवण ठरली.