For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूत पंतप्रधान मोदी यांचा रोडशो

06:50 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूत पंतप्रधान मोदी यांचा रोडशो
Advertisement

रामेश्वरमच्या मंदिरात पूजाआर्चा, अग्नितीर्थात केले स्नान, सोमवारी अयोध्येला जाणार

Advertisement

वृत्तसंस्था / रामेश्वरम्

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तामिळनाडू दौऱ्यात अनेक तीर्थस्थळांना भेटी देतानाच रामेश्वरम येथे भव्य रोडशो केला आहे. त्यांच्या रोडशोला स्थानिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून मार्गात अनेक स्थानी थांबून त्यांनी स्थानिकांचे आशीर्वाद घेतले आहेत. थिरुचिरापल्ली येथे त्यांनी इतिहासप्रसिद्ध रंगनाथस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजाआर्चा केली आहे. तसेच त्यांनी जगप्रसिद्ध रामेश्वरमच्या मंदिरातही श्री अरुलमिगू रामनाथस्वामींच्या मूर्तीच्या दर्शनानंतर अनुष्ठान केल.

Advertisement

रामेश्वरम येथे सहस्रावधी लोकांनी त्यांच्या रोडशोमध्ये सहभाग घेतला. अनेकांनी त्यांना अयोध्येच्या भगवान रामलल्लांना देण्यासाठी अनेक भेटवस्तूही दिल्या. अयोध्येच्या भव्य राममंदिरात भगवाग रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार असून त्यासंदर्भात तामिळनाडूमध्येही लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि उत्कंठा असल्याचे दिसून येत आहे. लोक आतुरतेने या कार्यक्रमाची प्रतीक्षा करीत आहेत. तामिळनाडूतील मंदिरांमध्येही जोरदार सज्जता होत आहे.

वृद्धेला केले अभिवादन

रोडशोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाटेत थांबून एका वृद्ध महिलेला दोन्ही हात जोडून अभिवादन केले. यामुळे उपस्थित नागरीकांमध्ये समाधानाची भावना दिसून आली. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते या रोडशोमध्ये सहभागी झाले होते. प्रशासनानेही रोडशोसाठी सुविधा उपलब्ध करुन दिली होती. हा रोडशो साधारणत: तीन तास चालला होता. लोकसभेच्या निवडणूक प्रचाराचा हा एक भाग होता.

अनेक तीर्थस्थळांमध्ये दर्शन

रामेश्वरमच्या प्रसिद्ध श्री अरुलमिगू रामनाथस्वामी मंदीरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर पूजा केली. तसेच येथे यांनी तामिळनाडूचे वैशिष्ट्या मानले गेलेल्या ‘कंबरामायणा’चे पठणही ऐकले. त्यानंतर त्यांनी श्रीरंगम मंदिरात पूजापाठ केला. या मंदिराचे तामिळनाडूच्या सांस्कृतिक इतिहासात मोठे महत्व आहे. या मंदिरात त्यांनी भगवान विष्णूंचे दर्शन घेऊन मूर्तीला ‘वेष्टी’ (पितांबर) आणि महावस्त्र अर्पण केले. थिरुचिरापल्लीचे हे मंदीर श्री रंगनाथस्वामी मंदीर म्हणूनही प्रसिद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मंदिराला भेट देणारे भारताचे प्रथम सर्वोच्च प्रशासनीय नेते ठरले आहेत, अशी माहिती देण्यात आली.

अग्नितीर्थात स्नान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरमच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तेथील सुप्रसिद्ध अग्नितीर्थात स्नान केले. स्नानावेळी आणि पूजापाठाच्या वेळी त्यांनी रुद्राक्षमालाही धारण केली होती. या मंदिराचा तिसरी दीर्घीका अतिशय प्रसिद्ध असून या मंदिराला सेतुपती मारवार शासकांनी मोठ्या प्रमाणात संपत्तीचे योगदान दिले होते. मारवार शासक हे तामिळनाडूतील रामनाद राज्याचे राजे होते.

रामेश्वरमचा रामायणाशी संबंध

तामिळनाडूच्या रामेश्वरम बेटावर हे मंदीर आहे. हा जिल्हा रामनाथपुरम म्हणून ओळखला जातो. प्रभू रामचंद्रांनी रावणावर आक्रमण करण्याआधी येथे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली होती, असे वाल्मिकींच्या रामायणात उल्लेखिलेले आहे. रावणापासून सीतामातेची सुटका प्रभू रामचंद्रांनी केल्यानंतर याच मंदिरात त्यांनी सीतामातेसह भगवान शंकरांची आराधना आणि पूजा केली होती.

22 जानेवारीला अयोध्येत आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 22 जानेवारीला, अर्थात, प्राणप्रतिष्ठेच्या दिनीच अयोध्येत आगमन होणार आहे. आधीच्या वृत्तानुसार ते आज रविवारी 21 जानेवारीला अयोध्येत येणार होते. तथापि, ते 22 जानेवारीला ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याच्या आधी 1 तास अयोध्येत येणार आहेत. ‘प्राणप्रतिष्ठा’ कार्यक्रम दोन प्रहरी 12 वाजून 20 मिनिटे ते 1.00 या कालावधीत होणार आहे. 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतच एका सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणार आहेत, अशी नवी माहिती देण्यात आली आहे. ‘प्राणप्रतिष्ठा’ कार्यक्रम 40 मिनिटांचा आहे.

ऐतिहासिक क्षण आला समीप

ड ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याची भारतासाह जगात चर्चा, कोट्यावधींना उत्कंठा

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येत आगमन 22 जानेवारीलाच होणार

ड ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळा 40 मिनिटांचा, त्यानंतर दिवसभर धार्मिक विधी

ड ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याला 54 देशांचे 100 प्रतिनिधी राहणार उपस्थित

Advertisement
Tags :

.