Karad : कराड शहरातील रस्त्यांची चाळण; ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
कराडमध्ये खड्डेमय रस्त्यांवरून नागरिकांचा संताप
कराड : रस्त्यातील खड्ड्यांतून प्रवास करताना कराडकरांना कसरत करावी लागत आहे. नुकताच काही रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र लवकरच नगरपालिका निवडणूकीची आचारसंहिता लागणार असल्याने कराडकरांना चांगल्या रस्त्यांसाठी निवडणुका संपण्याची बाट पहावी लागणार असल्याची चर्चा आहे.
रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक वैतागले आहेत तसेच खड्यांचा वाहतुकीवरही परिणाम होत आहे. शाहू चौकातून जुन्या कोयना पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मुळातच शाहू चौकात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने येथे बारंबार वाहतूक कोडी होते. त्यातच रस्त्यात खड्डे असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. जुन्या कोयना पुलाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. सध्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने जुन्या कोयना पुलावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे.
मात्र जुन्या कोयना पुलावरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने याचा त्रास वाहन चालकांना होत आहे. वाहतूक कोंडीबरोबरच वाहनचालक व दुचाकीस्वारांना अपघातांचा समाना करावा लागत आहे. शहरातील बैलबाजार रोड, विजय दिवस चौक ते भेदा चौक, बसस्थानक ते इदगाह रोड, सूर्यवंशी मळा रोड, सोमबार पेठेतील पाण्याच्या टाकीकडे जाणारा रस्ता यांसह शहरातील अनेक रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यातील बैलबाजार रोड, शाहू चौक ते जुना कोयना पूल या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. याबाबत पालिकेने टेंडरही प्रसिद्ध केले आहे. मात्र आचारसंहिता तोंडावर असल्याने कामे पूर्ण होणार का, असा प्रश्न आहे.