Kolhapur : सिलिंडरसाठी संभाजीनगरात रास्तारोको !
अनेक दिवसांपासून सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक आक्रमक
कोल्हापूर : संभाजीनगरमधील गॅस एजन्सीकडून अनेक दिवसांपासून सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने शनिवारी ग्राहक आक्रमक झाले. त्यांनी रस्त्यावर सिलिंडर ठेवत रस्ता रोको आंदोलन केले. याची दखल आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतली.
आंदोलनस्थळी त्यांनी नागरिकांशी चर्चा करुन प्रकार जाणून घेतला. यासंदर्भात आमदार क्षीरसागर यांनी प्रशासन आणि गॅस एजन्सीच्या सेल्स मॅनेजराशी संपर्क साधत तत्काळ सिलिंडर पुरवठा करण्याबाबत सूचना केल्या. त्यानंतर ग्राहकांनी आंदोलन मागे घेतले. अर्ध्या तासात सिलिंडर पुरवठा करण्यात आला.
संभाजीनगर येथील गॅस कंपनीकडून सिलिंडर पुरवठा होत नसल्याने ग्राहकांनी रास्ता रोको केला. दरम्यान याच मार्गावरून कागल दौऱ्यासाठी निघालेले आमदार क्षीरसागर यांनी येथे थांबत घटनेची माहिती घेतली. यावेळी नागरिकांनी गॅस वितरकाविषयी असलेल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
संबंधीत गॅस एजन्सीमार्फत सिलिंडर वितरण कंपनीला पैसे भरले नसल्यामुळे सिलिंडर पुरवठा झालेला नाही. त्यामुळे सणासुदीत सिलिंडर वितरण होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.